जय जवान ! सेवा पूर्ण करुन आलेल्या जवानाची ग्रामस्थांकडून जंगी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:41 PM2019-09-05T18:41:42+5:302019-09-05T18:49:29+5:30
सैनिकाचा कुटुंबियांसह केला गौरव
बारुळ (जि. नांदेड) : १६ वर्षे सैन्यदलात सेवा बजावून परत आलेल्या गजानन हाम्पले या जवानाचे स्वागत ग्रामस्थांनी गावातून उघड्या जीपमधून जंगी मिरवणूक काढून केले. गावातील मुख्य रस्त्याने कुटुंबियांसह मिरवणूक काढल्यानंतर जंगी सत्कार सोहळा राबवून काटकळंबा ग्रामस्थांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
काटकळंबा येथील भूमिपूत्र गजानन व्यंकटराव हाम्पले हे सैन्यदलात कार्यरत होते. १६ वर्षे त्यांनी सीमेवर राहून देशवासियांची सेवा केली. निवृत्तीनंतर गुरुवारी ते गावी पोहोचताच ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्त्याने हाम्पले कुटुंबियांची वाजतगाजत मिरवणूक काढली. गावातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर गजानन हाम्पले यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य प्रतीभाबाई चिखलीकर, संजय देशमुख, पोलीस निरीक्षक मुळे, सरपंच अनिता चावरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळू पानपट्टे यांच्यासह जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक साईनाथ गुच्चे, गोविंदराव कोळगिरे, दत्ता चवडे, राष्ट्रपाल चावरे आदींची उपस्थिती होती.
संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत काम
हाम्पले यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्रशालेत झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण बारुळ येथील शिवाजी विद्यालयात पार पडले. उमाकांत हत्ते या शिक्षकाने योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच आपल्याला सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे हाम्पले यांनी सांगितले. आग्रा येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रथम नेमणूक आसाममधील तेजपूर येथे मिळाली. या बरोबरच उल्लेखनीय कार्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने शांती सैनिक म्हणून दक्षिण अफ्रिका येथे एक वर्ष काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आसामसह जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब आदी राज्यांत त्यांनी काम केले. ग्रामस्थांनी केलेल्या या प्रेमपूर्वक सत्काराला आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावनाही हाम्पले यांनी यावेळी व्यक्त केल्या.