जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:54 IST2025-01-23T12:50:57+5:302025-01-23T12:54:08+5:30
सातासमुद्रापार उभारला जाणार शिवरायांचा पुतळा; येत्या ८ मार्च रोजी जपानचे राजे नारूहितो यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून त्या निमित्त देशभरात शिव स्वराज्य रथ यात्रा निघाली आहे.

जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आता सातासमुद्रापार जपानची राजधानी टोकियोमध्ये उभारला जाणार आहे. 'आम्ही पुणेकर' व सिओ ऑर्गनायझेशन या संस्थानी जपानमधील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या ८ मार्च रोजी जपानचे राजे नारूहितो यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून त्या निमित्त देशभरात शिव स्वराज्य रथ यात्रा निघाली आहे. मंगळवारी ही यात्रा नांदेड मुक्कामी होती.
शिव स्वराज्य रथ यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी सातारा येथून १५ जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. साताऱ्यानंतर कराड, कोल्हापूर, मालवण, निपाणी, चिकोडी, कुरुंदवाड, शिरोळ, मिरज, मंगळवेढा येथे या रथयात्रेचे जोरदार स्वागत करत सोलापूरमध्ये दाखल झाली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत जवळपास बारा राज्यातून आठ हजार किलोमीटर प्रवास करण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे ही यात्रा आली होती. तर ३ फेब्रुवारी रोजी ही शिव स्वराज्य रथ यात्रा दिल्ली येथे पोहचणार असून महाराष्ट्र सदन येथे दोन दिवस शिवरायांचा पुतळा दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी हा पुतळा जापानला रवाना होणार आहे. जापान येथील भारतीय वंशाचे आमदार योगेंद्र पुराणीक यांच्या पुढाकारातून ८ मार्च रोजी या पुतळ्याचे टोकियोत बसविण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे संयाेजक उत्तमराव मांढरे यांनी माहिती दिली.
प्लास्टिकपासून बनविला पुतळा
टोकियो येथे उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा पुणे येथील ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार विपुल आणि विराज खटावकर यांनी साकारला आहे. हा पुतळा प्लास्टिकपासून तयार करण्यात आला असून वजनाने हलका असून भूकंप प्रवण क्षेत्रात देखील हा पुतळा दिमाखदारपणे टिकाव धरणार आहे.