गरजवंतांच्या शिक्षणासाठी जैन संघटनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:56 AM2018-06-02T00:56:54+5:302018-06-02T00:56:54+5:30
अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़
पोकर्णा म्हणाले, अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाघोली येथील प्रकल्पात राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जातात़ त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी पाठविण्यात येतात़ २०१५-१६ मधील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची पात्र यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आली होती़ त्यानंतर ६० मुलांना शिक्षणासाठी पाठविले होते़ त्यातील १२ वीपर्यंतचे काही मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असून या ठिकाणी ४५ विद्यार्थी आजघडीला शिक्षण घेत आहेत़ आता २०१६-१७ या वर्षातील शासनाच्या मदतीस पात्र ठरलेल्या १२४ कुटुंबांतील पाल्यांची निवड करण्यात येणार आहे़ ११ जूनपर्यंत वाघोली प्रकल्पात प्रवेश निश्चित करण्यासाठी जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ वाघोली येथे बारावीपर्यंत शिक्षण या मुलांना दिले जाते़ त्यांच्या राहण्याची, प्रवासाची सोयही संघटनेच्या वतीने केली जाते़ आजपर्यंत पाठविलेल्यांपैकी अनेक मुले आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत़ पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते़
---
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेसोबत जैन संघटनेची चर्चा सुरु आहे़ या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे़ त्यामुळे या शिक्षण संस्थेतही विद्यार्थी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोकर्णा यांनी दिली़