येसगीची शाळा आता कायमची बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:03 AM2018-11-13T00:03:12+5:302018-11-13T00:05:54+5:30
बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे.
सगरोळी : बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र येसगी येथील शाळेच्या आसपास ४ कि़ मी़ अंतरापर्यंत एकही शाळा उपलब्ध नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या निर्णयाविरूद्ध येथील नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
येसगी येथील शाळा बंद न करता शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी गावक-यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत चार जिल्हा परिषद सदस्य आणि आ़सुभाष साबणे यांनी जिल्हा परिषद आणि शासनाकडे येथील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांच्याकडेही निवेदन दिले होते. सीमावर्ती भागांच्या माध्यमातूनही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील बिलोली तालुक्यातील येसगी जुने हे अंतिम टोकाचे गाव आहे. या गावालगत मांजरा नदी वाहते. १९८३ साली येथील मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे या गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या पुनर्वसनात अनेक कुटुंबांनी तेथेच राहणे पसंत केल्यामुळे अर्ध्याच गावाचे पुनर्वसन झाले असून अनेक कुटुंब तेथेच राहिले आहेत़ येसगी जुने येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. येथील शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत़ असे असताना विद्यार्थीसंख्या वाढल्यावर शाळा बंद करण्याचे पातक करण्यात आले.
गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे व वाढत्या इंग्रजी शाळांमुळे या शाळेची विद्यार्थीसंख्या कमी होत गेली. या शाळेतील विद्यार्थी संख्येच्या निकषावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू होऊन ४ महिन्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेवून पत्र शाळेस पाठविले आहे. तसेच शिक्षकांची अन्यत्र बदली करण्यात आली. शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे़
लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले
येसगी (जुने) या गावाच्या आसपास तीन ते चार किलोमीटर अंतराच्या आत दुसरी शाळा नाही. त्यामुळे येथील जि.प़ची शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सीमावर्ती भागाचे गोविंद मुंडकर, गंगाधर प्रचंड, राजू पाटील शिंदे, राजेंद्र जामनोर, व्यंकटराव पाटील सगरोळीकर, चंद्रकांत लोखंडे, हनुमंत कामशेटे यांनी हा विषय वरिष्ठ अधिकाºयांकडे प्रभावीपणे मांडला होता. याकडे आमदार आणि जिल्हा परिषदेचे चार सदस्य यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
शाळा बंदचा निर्णय अगोदर का नाही ?
विशेष म्हणजे, गतवर्षी या शाळेतील रिक्त असलेले एक शिक्षकाचे पद शिक्षण विभागाच्या वतीने भरण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी मोफत कपडे वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती मागवून शालेय गणवेशासाठीचे पैसे शाळेच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले आहेत. जर शिक्षण विभागाला येथील शाळा बंद करायचीच होती तर सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीसच शाळा बंदचा निर्णय न घेता शाळा सुरू होऊन ४ महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटल्यावर बंदचा निर्णय घेतला ? व तसेच येथील शाळा बंद करायचीच होती तर गतवर्षी रिक्त असलेले एका शिक्षकाचे पद यावर्षी का भरण्यात आले? असे प्रश्न गावक-यांना पडले आहेत.
गावक-यांत असंतोष
सीमावर्ती भागाचा तेलंगणा समावेशाचा प्रश्न उपस्थित झालेला असताना जिल्हाधिकारी विकासा- संदर्भात चर्चा करीत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या येसगी (जुने) येथील जि़ प़ शाळा बंद करण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे गावक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.