कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:51 PM2024-11-23T19:51:07+5:302024-11-23T19:52:23+5:30
भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला
- शेख शब्बीर
देगलूर: विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याची अटकळे बांधली जात असतानाच भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला आहे. या विजयासह सलग दुसऱ्यांदा अंतापुरकरांनी बाजी मारली आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणूकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जितेश अंतापुरकर यांनी दणदणीत विजय मिळविला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले जितेश अंतापुरकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यातच भाजपानेही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.
विशेष म्हणजे 2009 मध्ये राखीव झालेल्या या मतदारसंघात एकूण चार वेळा झालेल्या निवडणुकीत मुख्य लढत ही अंतापुरकर विरुद्ध साबणे यांच्यातच झाली होती. त्यातच पुन्हा एकदा तिसरी आघाडी कडून सुभाष साबणे व भाजपाकडून जितेश अंतापुरकर हे परंपरागत उमेदवार पुन्हा एकदा आमने- सामने आले होते. तर काँग्रेसने मात्र स्थानिक उमेदवाराच्या मागणी सह बौद्ध समाजाच्या उमेदवाराला संधी देत निवृत्ती कांबळे यांच्या रूपाने नवा चेहरा समोर आणला होता. त्यामुळे यंदा तिरंगी लढत होणार असा अंदाज होता. मात्र, काँग्रेसचे निवृत्ती कांबळे व भाजपाचे जितेश अंतापुरकर या दोघांमध्येच मुख्य लढत झाली. तर सुभाष साबणे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. एकूण मतदानावरून सुरुवातीला अटीतटीची होणारी ही लढत अगदी एकतर्फी होऊन भाजपाचे जितेश अंतापुरकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.