जो बोले सो निहाल ! ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:17 PM2020-08-20T17:17:32+5:302020-08-20T17:22:12+5:30
विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी नांदेडची १३ वीं सायकल वारी पूर्ण केली.
नांदेड : अमृतसर जिल्ह्यातील भूमा गावातील रहिवाशी स. बरागसिंघ यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी २२०० किमीचा महिनाभर सायकल प्रवास करीत, नांदेड येथील संचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. विशेष म्हणजे त्यांची ही १३ वी सायकल यात्रा आहे.
बरागसिंघ हे गुरुव्दाराच्या दर्शनासाठी दरवर्षी नांदेड येथे नियमित येतात. एका महिन्याचा सायकल प्रवास करीत ते नांदेडला पोहंचतात. विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी नांदेडची १३ वीं सायकल वारी पूर्ण केली. सरदार बरागसिंघ हे १६ जुलै २० रोजी अमृतसर येथून सायकल यात्रा सुरु करीत, हजुरसाहेब नांदेड कडे निघाले होते. लुधियाना, अंबाला, दिल्ली, आगरा, ग्वालियर, इंदौर, बुरहानपुर, हिंगोली असा जवळपास एक महीन्याचा प्रवास करीत ते नांदेडला पोहंचले. गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब आणि गुरुद्वारा लंगरसाहिबचे त्यांनी दर्शन घेतले.
यावेळी बरागसिंघ म्हणाले, वृद्धापकाळामुळे मला पुढे अशी यात्रा करणे कठिण दिसत आहे. तेव्हा ही माझी शेवटची सायकल यात्रा आहे. मी सायकलवर संपूर्ण देशाची यात्रा केली आहे. सर्व धर्मस्थळांचे दर्शन घेतले. स्वस्थ राहण्याच्या उदेश्याने सायकल यात्रा घडत गेल्या. पण पुढे शक्यता कमी वाटते. येथून गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावी शेती करेन. जर नशिबात पुढे दर्शन करण्याची संधि मिळाली तर एखाद्या वेळी ट्रक यात्रा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बराग सिंघ यांना दोन मूले आणि नातवंडे असून ते गावात शेती करतात.