धान्याच्या ट्रकचा उलट्या दिशेने प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:08 AM2018-08-04T00:08:02+5:302018-08-04T00:09:33+5:30

नांदेडातील धान्य काळाबाजार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे़ कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत एफसीआयच्या गोदामातून गेलेल्या दहा ट्रकपुरता मर्यादित हा विषय नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे़ जुलै या एकाच महिन्यात एफसीआयच्या गोदामातून तब्बल २७ ट्रक ठरवून दिलेल्या तालुक्याला न जाता विरुद्ध दिशेने प्रवास करीत थेट मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोहचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़

Journey in the opposite direction of the grain truck! | धान्याच्या ट्रकचा उलट्या दिशेने प्रवास !

धान्याच्या ट्रकचा उलट्या दिशेने प्रवास !

Next
ठळक मुद्देजुलै महिन्यात शासकीय धान्याचे २७ ट्रक मेगा अ‍ॅग्रो कंपनीत

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेडातील धान्य काळाबाजार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे़ कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत एफसीआयच्या गोदामातून गेलेल्या दहा ट्रकपुरता मर्यादित हा विषय नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे़ जुलै या एकाच महिन्यात एफसीआयच्या गोदामातून तब्बल २७ ट्रक ठरवून दिलेल्या तालुक्याला न जाता विरुद्ध दिशेने प्रवास करीत थेट मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोहचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ याबाबतचे सर्व सीसी टीव्ही फुटेज कहाळा येथील टोल नाक्यावरुन पोलिसांनी जप्त केले आहेत़ जवळपास आठवडाभर पोलीस या सर्व काळ्याबाजारावर नजर ठेवून होते़
शासकीय गोदामातील धान्याचा काळाबाजार होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई न करता या प्रकरणाचा छडा लावण्याच्या उद्देशाने अनेक दिवस एफसीआयच्या गोदामातून निघालेले ट्रक आणि कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोहचलेले ट्रक याच्यावर पाळत ठेवली होती़
मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत ट्रकद्वारे येणारे धान्य हे शासकीय वितरण व्यवस्थेतीलच आहे़ याबाबतची पक्की खात्री पटल्यानंतर पुरावे गोळा करुनच पोलिसांनी तेथे धाड मारली़ या ठिकाणी आढळलेले सर्व रेकॉर्ड आणि कहाळा येथील टोल नाक्यावरुन मिळविलेले सीसी टिव्ही फुटेज यावरुन एकट्या जुलै महिन्यात एफसीआय गोदामातून निघालेले शासकीय वितरण व्यवस्थेतील धान्याचे तब्बल २७ ट्रक मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेले होते़ प्रत्यक्षात धान्य घेवून निघालेले हे सर्व ट्रक कंधार, लोहा, मुदखेड, हदगाव, माहूर, अर्धापूर आदी तालुक्यांमध्ये जाणे अपेक्षित होते़
परंतु काळाबाजारासाठी धान्य घेवून निघालेले हे ट्रक विरुद्ध दिशेने प्रवास करीत कृष्णूरच्या कंपनीत पोहचले़ या ठिकाणी शासकीय धान्य भरुन येणाऱ्या ट्रकचे क्रमांक हे पेन्सिलने टाकण्यात येत होते़ तर विविध ठिकाणच्या ट्रेडींग कंपनीच्या ट्रकचे बनावट क्रमांक पेनने नोंद करण्यात येत होते़ अशाप्रकारे महिन्याकाठी जवळपास ३० हून अधिक शासकीय धान्याचे ट्रक मेगा अ‍ॅग्रो कंपनीत गेले़ हा सर्व प्रकार प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, गोदामावरील कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय होणे शक्य नाही़ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले़ त्यामुळेच घोटाळ्यातील ही साखळी उध्वस्त होण्याची चिन्हे आहेत़
---
वेषांतर : करुन पोलिसांनी केली टेहळणी
धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर लगेच धाड न मारता पोलिसांनी अगोदर या व्यवहाराचे सर्व पुरावे गोळा केले़ १२ जुलैपासून कृष्णूर येथील इंडीया मेगा अ‍ॅग्रो कंपनीच्या बाहेर वेषांतर करुन पोलिस कर्मचारी टेहळणी करीत होते़ १२ जुलै रोजी शासकीय धान्याचे ७ ट्रक कंपनीत गेले़ त्यानंतर १६ जुलैला ६ ट्रक गेले होते़ हे धान्य एफसीआयच्या गोदामातीलच आहे़ याची खात्री करण्यासाठी एफसीआयच्या गोदामाबाहेर काही पोलिस कर्मचारी वेष पालटून थांबले होते़ एफसीआयच्या गोदामातून धान्य घेवून ट्रक निघताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली़ या पाठलागाची इनकॅमेरा शुटींग करण्यात आली़ गोदामातून निघालेले हे ट्रक थेट इंडीया मेगा अ‍ॅग्रो कंपनीत पोहचताच पोलिसांनी हे धान्य एफसीआयच्या गोदामातीलच असल्याची खात्री पटली़
---
कंपनीच्या गोदामात परराज्यातील सहा हजार पोती आढळली
पोलिसांनी या कंपनीवर धाड मारली़ त्यावेळी कंपनीत पंजाब राज्य शासन, भारत सरकार खाद्य निगम, मध्यप्रदेश सरकारच्या शासकीय वितरण व्यवस्थेतील जवळपास सहा हजार पोती धान्य आढळून आले़ धान्याची ही पोती दिसताच काळाबाजाराची व्याप्ती अनेक राज्यात पोहचल्याचे पाहून पोलिसही अवाक् झाले़
---
अ‍ॅग्रो कंपनीच्या अजय बाहेतीची न्यायालयात धाव
इंडीया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीचे कार्यकारी संचालक अजय बाहेती यांनी पोलिस कारवाईच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे़ मेगा प्रोजेक्ट बंद ठेवण्याची पोलिस कारवाई रद्द करुन मेगा फुड पार्क पूर्ववत सुरु ठेवावा़ शासनाच्या मेगा प्रोजक्टमध्ये आंब्यापासून ज्यूस बनविणे, सरकीवर प्रक्रिया करुन पशूखाद्य बनविणे, सोयाबीनपासून तेल, हरभºयापासून दाळ, बिस्कीट, बेकरी, डेअरी प्रोडक्ट यासह १५ प्रक्रिया उद्योग आहेत़ त्यामध्ये एक हजारावर कामगार आहेत़ पोलिसांनी कलम ९१ प्रमाणे नोटीस देवून कागदपत्रे जप्त करणे अपेक्षित आहे़ पोलिसांच्या कारवाईमुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ मेगा प्रोजेक्ट बंद केल्यामुळे संविधानातील व्यवसाय करण्याचा मुलभूत अधिकारी हिरावून घेण्यात आला आहे़ मेगा पार्क उद्योगाचे परवाने रद्द किंवा निलंबित नसतानाही देखील पूर्ण प्रकल्प बंद ठेवण्याची कृती गैर असल्याचेही बाहेती यांनी याचिकेत म्हटले आहे़ बाहेतीतर्फे अ‍ॅड़सतिष तळेकर व प्रज्ञा तळेकर यांनी ही याचिका दाखल केली़

Web Title: Journey in the opposite direction of the grain truck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.