आठवडाभरात कार्यरत होणार नांदेडमध्ये जंबो कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:29+5:302021-04-07T04:18:29+5:30

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ...

The Jumbo Covid Center in Nanded will be operational throughout the week | आठवडाभरात कार्यरत होणार नांदेडमध्ये जंबो कोविड सेंटर

आठवडाभरात कार्यरत होणार नांदेडमध्ये जंबो कोविड सेंटर

Next

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नांदेड येथे अस्थायी जंबो कोविड सेंटर उभारले जाते आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोनावरील आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन व रेमडेसिवीरसारख्या औषधांचा मागणी व पुरवठा आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी संपर्क साधून, नांदेड जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.दिलीप म्हैसेकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात डॉक्टर व नर्सेसची कमतरता नसून, आवश्यक तिथे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी खासगी डॉक्टरांचीही सेवा घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देण्याचे निर्देशही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिले. त्या संदर्भात आवश्यकता भासल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेची माहिती देऊन नांदेड जिल्ह्याला अधिक लसींचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्ह्याला अधिक प्रमाणात लसी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील. कोरोनावरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता नाही. गरज भासेल, तिथे शासनाकडून पुरेशी मदत मिळवून दिली जाईल, असेही ते म्हणाले.

कोरोनासंदर्भात शासनाने केलेले नियोजन व कोरोना उपचारांच्या सुविधेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांची मदत घ्यावी, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कोरोनावरील उपचारांच्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन नंबर कार्यरत करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बाजारात सध्या हरभरा, गहू, मोठी ज्वारी आदी शेतीमालाची आवक सुरू असून, कोरोनाच्या आड भाव पाडले जाणार नाहीत, याबाबत पुरेशी दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

Web Title: The Jumbo Covid Center in Nanded will be operational throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.