कॉफी शॉपवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:03 AM2018-09-16T01:03:30+5:302018-09-16T01:04:50+5:30
शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक भागात एका कॉफी शॉपवर तीन जोडपे अश्लील चाळे करीत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमधील चित्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक भागात एका कॉफी शॉपवर तीन जोडपे अश्लील चाळे करीत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमधील चित्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला़
शहरात सर्वच भागात सध्या मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये तर कॉफी शॉपची मोठी क्रेझ आहे़ घरातून महाविद्यालय किंवा खाजगी शिकवणीला जाते म्हणून तरुण मुले-मुली तासन्तास या कॉफी शॉपमध्ये बसून अश्लील चाळे करीत असल्याचे मागील काही दिवसांतील घटनांवरुन स्पष्ट झाले़ मंद प्रकाश असलेल्या या कॉफी शॉपमध्ये कॅबिनची व्यवस्थाही करण्यात आली आहे़
काही ठिकाणी तर चक्क बेडही आढळले होते़ त्यानंतर पावडेवाडी ग्रामपंचायतने अशा १५ कॉफी शॉपचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता़ ग्रामपंचायतच्या या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले होते़ परंतु, त्यानंतरही छत्रपती चौकात अनधिकृतपणे एका कॉफी शॉपमध्ये असा प्रकार सुरुच होता़ शनिवारी सरपंच बंडू पावडे, भाजपाचे मिलिंद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बंडू पावडे यांना ही माहिती मिळाली़ त्यानंतर ग्रामस्थांसह त्यांनी कॉफी शॉपवर धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमध्ये तीन जोडपे अश्लील चाळे करीत होते़ धाडीवेळी हे जोडपे नको त्या अवस्थेत होते़
त्यानंतर भाग्यनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली़ या तीनही जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ त्याचदरम्यान कॉफी शॉपचा चालक मात्र पळून गेला़ या कॉफी शॉपमध्ये बसण्यासाठी मोठ्या आकाराचे सोफे ठेवण्यात आले होते़ दोन सोफ्यांमध्ये आडोशाचीही व्यवस्था करण्यात आली होती़ त्याचबरोबर या ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या़
दरम्यान, पोलिसांनी तीनही तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडून दिले असून तरुणींच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले़ या प्रकारामुळे शहरातील कॉफी शॉपवर सुरु असलेले हे भलतेच प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत़
दरम्यान, शहरातही अनेक कॉफीशॉप, हॉटेलांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जादा शुल्क आकारले जात आहे. ही जादा शुल्क आकारणी नेमकी कशासाठी असते? याचा शोध पोलिसांच्या दामिनी पथकाला घ्यावा लागणार आहे.
काही पालकांनीच या कॉफी शॉपबाबत तक्रारी केल्या होत्या़ त्यानंतर ग्रामपंचायतने पंधरा कॉफी शॉप बंद केले होते़ त्यानंतरही अनधिकृतपणे हे कॉफी शॉप सुरु होते़ त्यामुळे तरुण-तरुणींनी अवैध प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या कॉफी शॉपमध्ये जावू नये, असे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे़
कॉफी शॉपमध्ये तासाला ३२० रुपये
कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी तासाला ३२० रुपये आकारण्यात येत होते़ या ठिकाणी रजिस्टरच्या नोंदीवरुन तर काही जोडप्यांचे बिल चक्क दोन हजार रुपयांपर्यंत झाले होते़ याचा अर्थ दिवसभर हे जोडपे या शॉपमध्ये बसून होते़ तर दुसरीकडे शॉपमध्ये असलेले कॉफी बनविण्याचे साहित्य धूळखात पडलेले, हे विशेष! गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी कॉफी किंवा अन्य कोणतेही पदार्थ बनविण्यात आले नव्हते हे त्यावरुन स्पष्ट होते़ त्यामुळे अवैध प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठीच हे कॉफी शॉप सुरु करण्यात आल्याचे दिसून येते़