‘कैफी आझमी जीवननिष्ठ, साहित्यनिष्ठा शायर होते’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:17 AM2021-02-12T04:17:36+5:302021-02-12T04:17:36+5:30
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रूपवेध ग्रंथालयाच्या वतीने नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत कैफी आझमी आयडिया ऑफ इंडियाचा भाष्यकार या विषयावरील ...
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रूपवेध ग्रंथालयाच्या वतीने नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत कैफी आझमी आयडिया ऑफ इंडियाचा भाष्यकार या विषयावरील ३८ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, कैफी आझमी एकनिष्ठ कम्युनिस्ट होते. आपला जमीनदारावरील हक्क सोडून, गरिबांसाठी कामगारांसाठी कफल्लक जीवन जगणाऱ्या या शायरमध्ये क्रांतीची धमक होती. त्यांनी समाजवादाचा केवळ पुरस्कारच केला नाही, तर रस्त्यावर येऊन नाही रे वर्गासाठी मोर्चे काढले.
कैफी आझमी यांच्या वडिलांनी त्यांच्या इतर भावांना इंग्रजी शिक्षण दिले. कैफींना मात्र त्यांनी मदरशामध्ये घातले; पण तेथेही त्यांनी संप पुकारला. पक्षाच्या वतीने मिळणाऱ्या मानधनावरच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांनी क्रांतीचे स्वप्न पाहिले. त्यांना धर्म व जातीभेद नष्ट झालेला हिंदुस्थान घडवायचा होता. त्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली.
जम्मू- काश्मीर व तेलंगणा या राज्याची राजभाषा असणाऱ्या उर्दू भाषेस आपण नाॅन सेक्युलर भाषा म्हणतो, ही खेदाची बाब आहे. उर्दू ही मुस्लिमांची भाषा म्हणून तिची उपेक्षा झाली आहे. या भाषेविषयी सांगावे व उर्दूची तरजीब आपल्यापर्यंत न्यावी, या उद्देशाने हा विषय निवडला, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.