कामजळकेवाडीकरांनी पाण्यासाठी रचली चिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:59 PM2019-03-25T23:59:01+5:302019-03-26T00:00:00+5:30
लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी
माळाकोळी : लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च रोजी गावातील महादेव मंदिरासमोर सामूहिक आत्मदहन करण्याच्या हेतूने सरण रचले़ पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
कामजळकेवाडी गावची लोकसंख्या ३०० आहे. गावात पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. यासंदर्भात संबंधितांचे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी ७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून उपरोक्तप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय कळविला होता. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी २५ मार्च रोजी एकत्र जमले. गावातील महादेव मंदिरासमोर त्यांनी सरण रचले होते़ मात्र पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.