नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:33 AM2018-08-10T00:33:19+5:302018-08-10T00:34:45+5:30

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़

Kandadit bandh in Nanded district | नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षण : शाळा, महाविद्यालयात शुकशुकाट, वाहतूकही ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़ नांदेड शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावर आणि मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलकांनी ठिय्या, भजन, रास्तारोको केला़ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विविध संघटनांच्यावतीने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी होते़ बंदनिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातही शुकशुकाट होता़ एस़टी़ महामंडळाची वाहतूक पुर्णपणे बंद होती़ आंदोलनाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याचे दिसून आले़ यामुळे प्रवाशांचे काहींसे हाल झाले़
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलनादरम्यान दाखल केलेल सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आंदोलनाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या तरूणाच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी व कुटुंबास ५० लाख रूपये आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती़ या आंदोलनास नांदेड जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ दरम्यान, काही ठिकाणी आंदोलकांनी रस्ता अडविण्यासाठी रस्त्यावर टायर जाळले तर काही ठिकाणी झाड तोडून रस्ता बंद केला होता़ नांदेड शहरात येणाºया सर्वच रस्त्यावर आंदोलन करण्यात आली़
नांदेड शहरातील छत्रपती चौक, तरोडा नाका, सरपंचनगर, कौठा पुल, असर्जन कॉर्नर, आनंदनगर चौक, विष्णूनगर, अण्णाभाऊ साठे चौक, आयटीआय कॉर्नर, शिवाजीनगर उड्डानपुल, सांगवी, चैतन्यनगर, श्रीनगर आदी ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले़ दरम्यान, काही आंदोलकांनी तरोडा नाका परिसरातील दुभाजकाची तोडफोड केली तर आनंदनगर परिसरात टायर जाळून शासनाचा निषेध नोंदविला़
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मुख्य आंदोलन झाले़ याठिकाणी पहाटेपासूनच मराठा समाजबांधवानी एकत्र यायला सुरूवात केली़ सकाळी १० वाजेच्या सुमारास जिजाऊ वंदनेनी आंदोलनास सुरूवात झाली़ यानंतर दिवसभर शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिय्या दिला़ यावेळी काळ्या साड्या-पंजाबी ड्रेस घालून असलेल्या महिला-मुलींची उपस्थिती लक्षणीय होती़ आंदोलकांनी दिवसभर ‘एक मराठा लाख मराठा’, आरक्षण आमच्या हक्काचे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता़
अनेकांनी भाषणे केली तर भजन, पोवाडा सादर केला़ दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ परंतु, एकाही आंदोलकाने बाजूला न सरकता पावसातही ठिय्या दिला़ कोपर्डी येथील घटनेनंतर मराठा क्रांती मूक मोर्चाना सुरूवात झाली़ परंतु, आजपर्यंत कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी झाली नाही़ शासन अकार्यक्षम असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत आहे़ कोपर्डी येथील बहीण असो की देशातील कुठलीही बहीण असो; तिच्यावर अत्याचार करणाºया नराधमाला फाशीच द्या, अशी मागणी आंदोलकर्त्या तरूणींनी भाषणात व्यक्त केली़
---
कौठ्यात गायी-म्हशींसह आंदोलक रस्त्यावर
शहरात येणाºया सर्वच रस्त्यावर दिवसभर आंदोलने सुरू होती़ कौठा परिसरात आंदोलकांनी बैलगाडी, गुरा-ढोरासह तर लातूर फाटा परिसरात शेळ्या- मेंढ्या, गायी-म्हशी रस्त्यावर बांधून आंदोलकांनी ठिय्या दिला़ कौठा परिसरात रस्त्यावर बैलगाड्या आडव्या लावण्यात आल्या होत्या़ याठिकाणी आंदोलकांनी कीर्तन, भजन करून दिवसभर ठिय्या दिला़
----
मुस्लिम बांधवांनी घडविले एकात्मतेचे दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात मुस्लिम समाजबांधवांनी बिस्किटे आणि पाणी बाटल्यांचे वाटप करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले़ तसेच मुस्लिम समाजाचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे बॅनर ठिकठिकाणी लावून मुस्लिम समाजबांधवांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
---
आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था
गुरूवारी दिवसभर बंद पाळण्यात आला़ बंदमुळे अडकलेल्या प्रवाशांसह बंदोबस्तावर असणाºया पोलीस कर्मचाºयांसाठी अनेक ठिकाणी चहा, पोहे, खिचडी तर काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती़ नांदेड शहरातील चंदासिंग कॉर्नर, लोहा तालुक्यातील सोनखेड, अर्धापूर तालुक्यातील पार्डी, कामठा आदी ठिकाणी दिवसभर पंगती उठल्या़
---
शहरात दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमिवर बुधवारी रात्रीपासूनच नांदेड शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ गुरूवारी नांदेड जिल्ह्यात शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलासह अनेक प्लाटूनची नियुक्ती केली होती़ ठाणेनिहाय बंदोबस्ताचे नियोजन केले होते़ तसेच १ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ पोलीस उपअधीक्षक, २७ पोलीस निरीक्षक, १०१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ११७३ पोलीस कर्मचारी, ५५ महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या २ कंपनी, आरसीपी ८ प्लाटून, शीघ्र कृती दलाची १ कंपनी, ४८९ पुरुष होमागार्ड तैनात करण्यात आले होते़

Web Title: Kandadit bandh in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.