कंधार, माहूर तालुका अलर्ट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:51+5:302021-01-16T04:20:51+5:30
नांदेड : माहूर तालुक्यातील पापलवाडी व कंधार तालुक्यातील नावंद्याची वाडी शिवारात कोंबड्यांचा मृत्यू हा कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट ...
नांदेड : माहूर तालुक्यातील पापलवाडी व कंधार तालुक्यातील नावंद्याची वाडी शिवारात कोंबड्यांचा मृत्यू हा कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झाले नसून, ही दोन्ही गावे व १० कि. मी. अंतराचा परिसर सतर्क झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील पापलवाडी व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी शिवारात अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्या होत्या. कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हा संसर्ग इतर ठिकाणी होऊ नये म्हणून प्राण्यांमध्ये संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध अधिनियमानुसार ही दोन्ही गावे सतर्क भाग अर्थात अलर्ट झोन म्हणून घोषित केली आहेत. या प्रभावी क्षेत्रातून वाहनांची ये-जा बंद ठेवण्यात येईल. तसेच या ठिकाणाहून जिवंत कोंबड्या, अंडी, पशुखाद्य आदी बाबीच्या वाहतुकीस मनाई केली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच या आजाराचे निदान होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार, यात्रा, प्रदर्शन बंद ठेवण्यात यावेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.