कंधार ते बारूळ राज्य महामार्ग होतोय खड्डेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:12+5:302020-12-15T04:34:12+5:30
कंधार ते बारूळ या राज्य महामार्ग रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक खड्डे पडले होते. हे खड्डे चुकवताना नागरिक व ...
कंधार ते बारूळ या राज्य महामार्ग रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक खड्डे पडले होते. हे खड्डे चुकवताना नागरिक व वाहनचालकांच्या अक्षरश: नाकीनऊ आले होते. कंधार ते बारूळमार्गे जाणारा नरसी हा रस्ता राज्यमार्ग असला तरी या रस्त्यांमधून राष्ट्रीय महामार्गही जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्त्याचे काम लवकरच करणार असल्याचे आश्वासन लोहा येथे दिले होते; परंतु एक वर्षे उलटले तरी या रस्त्याच्या कामाला कुठे आडकाठी आली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कवठा, बारूळ, काटकळंबा, हळदा, चिखली, बाचोटी, मंगल सांगवी, धर्मापुरी, चिंचोली, वरवंड, राहते, वसंतवाडी, आवळा, नंदनवन, दहीकळंबा यासह जवळपास पन्नास ते साठ गावांना तालुक्यासाठी जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो, तसेच हा रस्ता लातूर प्रवासासाठी हैदराबादला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असून, या रस्त्यासाठी नुसते आश्वासन मागील अनेक वर्षांपासून देण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण अजूनही झाले नाही. मागील पंधरा वर्षांपासून डागडुजीचे काम होत आहे. त्यावर करोडो रुपये आतापर्यंत खर्चही झाला; परंतु सध्याच्या रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. हा रस्ता पंधरा किलोमीटरचा असला तरी त्यासाठी तब्बल दीड ते दोन तास वेळ लागत आहे.
या रस्त्याची दुरवस्था ‘लोकमत’ने नेहमीच उघड केली आहे. आताही डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. दुधावरची भूक ताकावर भागिवण्याचाच प्रकार सध्या सुरू आहे. थोडासा दिलासा आहे. तालुक्यातील राज्यमार्ग खड्डेमुक्त होत असल्याचे दिसत आहे; परंतु नागरिकांची मागणी डांबरीकरणाची आहे.