कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:57 AM2018-11-07T00:57:45+5:302018-11-07T00:58:55+5:30

शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे.

Kandhar Health Department In Drug Dysfunction | कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

Next
ठळक मुद्देसामान्यांच्या खिशाला कात्रीखाजगी औषधी दुकानदारांची चांदी

कंधार : शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. साध्या आजाराचा उपचार घेताना सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र, खाजगी औषधी दुकानदाराची चांदी होत असल्याचे रूग्ण व नातेवाईक उघडपणे बोलत आहेत.
आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. आणि शहरात ग्रामीण रूग्णालय निर्माण करण्यात आले. परंतु, हे आरोग्य सेवेचे केंद्र मात्र सतत नानाविध कारणांनी चर्चेत असतात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा, अस्वच्छता आदींने रूग्णांची होणारी हेळसांड चर्चेचा विषय ठरतो. आता गत काही महिन्यांपासून आरोग्य विभागात औषधीतुटवडा असल्याने रूग्ण व नातेवाईकांची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.
उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात गत काही महिन्यांपासून वातावरणबदलाने सर्दी, ताप, खोकला आदींचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच स्थिती शहरातील ग्रामीण रूग्णालयात आहे. परंतु, पॅरासेटमल, कफसिरफ, सेट्रीज, सेट्रान अशी औषधीची वाणवा आहे. मलमपट्टीचे साहित्य व औषधी नाहीत. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांना रूग्ण व नातेवाईकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील बारूळ, कुरूळा, उस्माननगर, पेठवडज, पानशेवडी या पाच आरोग्य केंद्रांत बाह्यरूग्ण विभागात प्रतिदिन ६०० ते ७०० रूग्ण उपचारासाठी येतात. आता खिशात दमडी असेल तरच या केंद्रात यावे लागते. अशी स्थिती झाली आहे. मलेरियाची औषधी नसल्याने नागरिकांचा रोष सहन करण्याचा प्रसंग कर्मचाºयांवर आला आहे. मुळात सामान्य कुटुंबातील नागरिक येथे येतात. साधा आजार असला तरी कंधारला उपचारासाठी पाठविले जात आहे. पण आगीतून फुफाट्यात अशी गत कंधारात आहे. ‘नाव मोठे लक्षण खोटे’ असा औषधी तुटवड्याचा ग्रामीण रूग्णालयात अनुभव घ्यावा लागतो आहे. एक तर स्वखर्चाने औषधी खरेदी करावी लागतात, अन्यथा नांदेडला पाठवले जाते. असा उपचार प्रवास खडतर झाला आहे.
पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट १ हजार ३०० पेक्षा अधिक असते. परंतु, कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेच्या अत्यावश्यक औषधीचासुद्धा तुटवडा असल्याने हे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा सवाल आहे. सर्दी, ताप, खोकला या औषधींचा दुष्काळ असताना प्रतिजैविके औषधी तुटवड्याची त्यात भर आहे. रूग्णकल्याण समितीच्या निधीतून औषधीची सोय तोकडेपणाने करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील खरीप हंगाम पावसाअभावी होरपळून गेला आहे. परंतु दुष्काळी नोंद होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिक खरीप हंगामाचा खर्च निघत नसल्याने हवालदिल झाला आहे. परंतु, आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. कंधार तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आरोग्य समस्येकडे लक्ष देता येईल का? असा खोचक सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे. राजकीय शह काटशहाचे राजकारण तापले असताना आरोग्य विषय गौण आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे.


राज्यपातळीवरुन औषधींचा पुरवठा होईना !
राज्य व जिल्हा पातळीवरून औषधींचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. परंतु, रूग्णकल्याण समितीच्या निधीतून खर्च करत औषधी उपलब्ध केली जात आहेत आणि रूग्णसेवा केली जात आहे -डॉ. एस.पी.ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी, कंधार

Web Title: Kandhar Health Department In Drug Dysfunction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.