जलयुक्त शिवार अभियानामध्ये कंधार तालुका औरंगाबाद विभागात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 01:26 PM2017-11-18T13:26:01+5:302017-11-18T13:31:27+5:30
जलयुक्त शिवार अभियानात नेत्रदीपक कामगिरी करीत कंधार तालुक्याने नवा इतिहास रचत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
कंधार ( नांदेड ) : मन्याड खो-याने सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात नेत्रदीपक कामगिरी करीत तालुक्याने नवा इतिहास रचत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. १० लाखांचे बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळाले. निवडलेल्या २३ गावांत १९९१ कामे पूर्ण झाली असून त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत २ मीटरने वाढ झाली. एक संरक्षक सिंचन दिल्यास ५२३ हेक्टर आणि दोन संरक्षक सिंचन दिल्यास २६४ हेक्टरला फायदा झाला.
राज्य शासनाने कोरडवाहू शेतीत शाश्वत पाणीसाठा निर्माण करणे, गावातील पाणीटंचाई दूर करणे, पिकांना संरक्षित पाण्याची सोय उपलब्ध करणे आदींसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले़ त्यात कंधार तालुक्यातील २३ गावे २०१५-१६ मध्ये निवडण्यात आली होती़ त्यात झालेला लोकसहभाग व शासकीय योजनेतून २२०९९७४ घनमीटर गाळ काढण्यात आला़ यासाठी ३ कोटी २० लाखांचा खर्च झाला़ लोकसहभाग व यांत्रिकीकरण विभागांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे २१ कि़मी़चे काम झाले़ कृषी विभागामार्फत ढाळीचे बांध ४८४५ हेक्टर झाले़ शेततळी २६, सिमेंट नालाबांध-४, विहीर पुनर्भरण- १८६ आणि ठिबक सिंचन ४४१ हेक्टरचे काम करण्यात आले़ लघूसिंचन व जलसंधारण विभागाकडून साखळी सिमेंट काँक्रिट बंधारे ४४ बांधण्यात आले़
लघूसिंचन पाणीपुरवठा विभागाकडून रिचार्ज सॉक्ट-८ व एका पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली़ सामाजिक वनीकरण विभागाकडून आठ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली़ नाला खोलीकरण हे यांत्रिकी विभाग व लोकसहभाग यांच्या सहाय्याने २१ कि़मी़चे काम वनखात्याकडून खोल सलग समतलचर ६६० हेक्टर, वनतळी ५ पूर्ण करण्यात आली़ ग्रामपंचायत विभागाकडून १ कि़मी़ शोषखड्डा करण्यात आला़ ५९९ शोषखड्डे करण्यात आले़ विविध विभागांमार्फत केलेल्या कामामुळे नियोजित पाणीसाठा २५५६ टीसीएमने वाढविण्याचे काम केले़ प्रत्यक्ष पाणीसाठा २०४८ टीसीएम निर्माण झाला़ विहिरीची पाणीपातळी २ मीटरने वाढली़ २३ गावे टँकरमुक्त झाली़ ही किमया जलयुक्त शिवार अभियानाने साधली़
अभियानाला अनेकांचे सहकार्य
जलयुक्त शिवार अभियान तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार, सुरेश काकाणी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले़ तत्कालीन उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, तहसीलदार अरुणा संगेवार, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अभियंता कुलकर्णी, एंबडवार, वनविभागाचे पाटील, गीते, यांत्रिकीकरण उपअभियंता सावंत, सामाजिक वनीकरणाचे शेख आदी अधिकारी, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था यांनी अभियानाला गती दिल्याने विभागीय पातळीवर कंधारने आपल्या कामाचा ठसा उमटविला़ त्यामुळे प्रथम क्रमांक मिळाला़ तालुका जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष आ़.प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष गावपातळीवर कामाचे अवलोकन करत कामे गतिमान होण्यासाठी प्रयत्न केले़
तालुक्यातील गऊळ गावात झालेल्या कामामुळे गाव पाणीदार झाले़ १९९१-९२ मध्ये गावाला सुरु केलेले टँकर बंद झाले़ एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाच्या दुसºया बॅचमधून गावात ढाळीचे बांध ३९८ हेक्टर, सलग समतल चर ५८ हेक्टर मातीनाला बांध ३, खोल सलग समतल चर १० हेक्टर काम करण्यात आले़ ५१८ हेक्टरची बांध बंधिस्ती, एक कि़मी़चे नाला खोलीकरण व रुंदीकरण व २७० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला़ गाव अभियानात जिल्ह्यात तिसरे आले़ ५० हजारांचे बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्राचे गाव मानकरी ठरले़ कंधार तालुका विभागातून पहिला आला़ जिल्ह्यातून उस्माननगर दुसरे व गऊळ तिसरे आले़ एकूणच तालुक्याला ११ लाख २५ हजारांचे बक्षीस मिळाले़ लोहा तालुका जिल्ह्यात दुसरा आला. ३ लाखांचे बक्षीस मिळाले़
सर्वांची साथ मिळाली
जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शान मोलाचे ठरले़ लोकांचा सहभाग, विविध सामाजिक संघटना आदींची साथ मिळाली़ त्यातून झालेल्या कामामुळे जलसाठा निर्माण झाला़ पाणीटंचाई गावातून दूर झाली़ नाम फाऊंडेशन, शिर्डी संस्थान, लोकसहभाग, विविध शासकीय यंत्रणांचा योग्य समन्वय साधून कामे पूर्ण करण्यात आली़ शासनाचे अभियान यशस्वीपणे राबविले
- संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, कंधाऱ