कंधार तालुक्याच्या पाणंदमुक्तीचा गाडा रेती तुटवड्यात रुतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:41 PM2018-02-23T17:41:26+5:302018-02-23T17:45:14+5:30
कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़
- गंगाधर तोगरे
कंधार ( नांदेड ) : तालुका पाणंदमुक्ती करण्यासाठी नानाविध अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होत आहे़ निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त लांबणीवर जात असल्याचे समोर आले आहे़
तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत व सहाय्यक गटविकास अधिकारी कैैलास बळवंत यांनी विविध टप्पे केले़ त्यातून ११६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त करण्यासाठी योग्य नियोजन केले़ त्यासाठी विस्तार अधिकारी शिवाजी ढवळे, बी़एम़ कोठेवाड, टी़टी़ गुट्टे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ झपाटून शौचालय बांधकामासाठी सरसावले़ परंतु कधी खरीप हंगामाची काढणी, कधी निधीची वाणवा आदीने कामाला खीळ बसली़ मात्र वरिष्ठ स्तरावरून निधीची पूर्तता करण्यासाठी सहकार्य मिळाले़ फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ कोटींचा निधी तालुका स्तरावर प्राप्त झाला़ त्याचा विनियोग करण्याचे योग्य नियोजन केले़ १७ गावे त्यातून पाणंदमुक्त करण्याचे निश्चित झाले़
तालुक्यात अद्याप ५९ गावे पाणंदमुक्त होण्यासाठी धडपडत आहेत़ बोरी खु़, कौठा, धर्मापुरी मजरे, शिराढोण, रूई, शिरसी बु़, पांगरा, नारनाळी, आलेगाव, राऊतखेडा, दैठणा, पानशेवडी, शिरूर, हाळदा, हाडोळी ब्ऱ, नागलगाव, उमरज, मानसिंगवाडी, मंगनाळी, कंधारेवाडी, मंगलसांगवी, दिग्रस बु़, दाताळा, दिग्रस खु़, फुलवळ, पोखर्णी, रामानाईकतांडा, आंबुलगा, विजेवाडी, हाटक्याळ, सावरगाव (नि़), कोटबाजार, पोनभोसी, शेकापूर, संगुचीवाडी, बाचोटी, येलूर, कुरुळा, बामणी, बोरी बु़, उस्माननगर, दहीकळंबा, शेल्लाळी, लाडका, पेठवडज, कल्हाळी, वहाद, गुंटूर, तेलूर, औराळ, घागरदरा, गोणार, गऊळ, घोडज, धानोराकौठा, नंदनवन, खंडगाव (ह), चिखली, मसलगा या गावातील ९ हजार ५८५ शौचालये बांधकामे पूर्ण झाल्यानंतर तालुका पाणंदमुक्त होणार आहे़ मार्च अखेरपर्यंत तरी तालुका पाणंदमुक्त होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ कारण ४ ते ५ हजार ब्रास रेतीचे दर झाले आहेत़ मातीमिश्रीत जुनी रेतीला भाव मिळत आहे़ त्यामुळे मिळणारा निधी व बांधकामाचा खर्च कसा जुळवायचा हा प्रश्न आहे़ रेतीचा तुटवडा, त्यात पदरमोड करण्यासाठीची स्थिती, दुष्काळ, गारपीटीमुळे लाभार्थ्यांची राहिली नाही़
२ कोटीतून ६० गावांतील कामावर केले लक्ष केंद्रित
शिल्लक गावातील शौचालयाची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावर ६ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत तालुका पाणंदमुक्त करण्याचे सूचित केले़ त्यासाठी चौदाव्याा वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशी १० कोटी ७७ लाख व २ कोटीतून ६० गावातील कामावर लक्ष केंद्रित करण्यात आले़ १० हजार ५१९ शिल्लक बांधकामे पूर्ण करण्यासाठी १५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली़ परंतु १४ फेब्रुवारीपर्यंत त्यातील फक्त ९३४ शौचालयाची बांधकामे करण्यात आली़ १ गाव पाणंदमुक्त होऊन एकूण पाणंदमुक्त गावाची संख्या ५७ झाली.