राज्यातील एकमेव कंधारचे लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाईला हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:08 PM2023-09-29T13:08:19+5:302023-09-29T13:10:50+5:30
लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते.
कंधार (जि.नांदेड) : राज्यातील एकमेव असलेले कंधार तालुक्यातील गऊळ येथील लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
१६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लाल कंधारी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धन करण्यासाठी अंबेजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते. कंधार, लोहा, मुखेड, बिलोली तसेच परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड तालुक्यात या गायीचे पालन करतात. संपूर्ण लाल रंग, मस्तक मध्यम आकाराचे, डोळे लांबट व काळे, नाकपुडी काळी, लहानसर, दुधाची शीर स्पष्ट व सरळ असते. कातडी अत्यंत चमकदार व खूर करड्या रंगाचे व टणक असतात.
परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता गफूर व माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी भारत सरकारकडे पाठपुरावा करून लालकंधारी जात ही इतर पशुधनापेक्षा वेगळी असल्याची मान्यता मिळविली. या पशुधनाचा शास्त्रीय पायाभूत विकास व्हावा आणि पशु मालकाला आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लाल कंधारी गोसंवर्धन केंद्राची स्थापना गऊळ येथे करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शंकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लाल कंधारी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. या स्थानिक जातींचे वैशिष्ट्ये म्हणजे सदर जाती या दूध उत्पादन व नर पशुधन शेती कामासाठी उपयुक्त आहेत.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
जिल्ह्याचे वैभव असलेले लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र कै. भाई डॉ. केशवरावजी धोंडगे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्याचे काम केले. तब्बल ९ ते १० वेळेस येथील गाय व वळूला राष्ट्रीयस्तरावर गौरविण्यात आले. अशी पार्श्वभूमी असल्याने कंधार तालुक्यातील गऊळ येथे संवर्धन केंद्र स्थापन केले होते; पण पाहिजे तेवढा निधी मिळाला नव्हता. आता हे केंद्रच हलविण्यात आले. त्यांचा मी निषेध करतो. याकरता पाठपुरावा करणारा असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेणार आहे. - ॲड. मुक्तेश्वर केशवराव धोंडगे, शिवसेना नेते.