वानरांचा धुमाकुळ, नुकसान आणि भीतीने कासराळीकर वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:07 AM2021-02-05T06:07:41+5:302021-02-05T06:07:41+5:30
कासराळी : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कासराळीत सातत्याने वानर व माकडांनी उच्छाद मांडला असून, गच्चीवरील वाळवण आणि शेतातील उभे ...
कासराळी : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कासराळीत सातत्याने वानर व माकडांनी उच्छाद मांडला असून, गच्चीवरील वाळवण आणि शेतातील उभे पीक माकडे फस्त करत आहेत. यावेळी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास या वानरांची सामूहिक टोळी नागरिकांवर प्रतिहल्ला करत असून, यामुळे शेतकरी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कासराळी परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वानरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, एकाहून अधिक संख्येने या टोळ्यांनी गावालगत असलेल्या शेतात, झाडांवर आपले बस्तान बसवले आहे. शेतीतील निर्मनुष्यतेचा फायदा उठवत वानरांकडून हरभरा, ज्वारी, तूर, टरबूज आदी पिके फस्त केली जात आहेत. वानरांच्या उभ्या पिकात बागडण्यानेही तेवढेच नुकसान होत आहे तर घरासमोरील मोकळ्या जागेत, गच्चीवर वाळवणासाठी ठेवलेल्या धान्याचीही विल्हेवाट लावत आहेत. वानर महिला, लहान बालकांच्या अंगावर खेकसतात. शेतातील वानरांच्या या धुमाकुळाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असून, नुकसानही होत आहे. तसेच हुसकावून लावणाऱ्या शेतकऱ्यांवर वानर सामूहिकपणे हल्ला चढविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रतिकार केला तरीही अनेकदा वानरांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वानर व माकडांच्या या उपद्रवाने कासराळीकर कमालीचे वैतागले असून, वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवासी गजानन कोटपलवाड यांनी नांदेड येथील सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार यांच्याकडे केली होती. मात्र, यासाठी कसलेही बजेट वन विभागाकडे नाही. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या वानरांचा बंदोबस्त करावा, असे सुचवल्याने कासराळीत वानरांच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांनी सामाजिक माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. सध्या तरी येथील महिला, बालकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत असून, वानरांनी कासराळीकरांना पुरते हैराण केले आहे.