खादी ग्रामोद्योगच्या उभारीसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:00+5:302021-08-18T04:24:00+5:30
शहरातील व्यंकटेश नगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार दि. १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा ...
शहरातील व्यंकटेश नगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार दि. १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योगाचे ईश्वरराव भोसीकर , हंसराज वैद्य ,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर , काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थित होते .
यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ईश्वरराव भोसीकर यांनी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज देशातील १६ राज्यात पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. या समवेतच मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अन्य प्रश्नांकडेही लक्ष वेधले.
या प्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, यंदाचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या पुनरूज्जीवनासाठी राज्य शासनाकडून मदत करण्यात येईल. या संस्थेतील बंद पडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. या वास्तूचे जुने रुप कायम ठेवून इमारतींना बळकटी देण्यासंदर्भात काय करता येईल याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर करावा असे निर्देश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.