उद्या पासून होणार माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 06:22 PM2019-12-23T18:22:04+5:302019-12-23T18:22:56+5:30

देवस्वारीसह मंगळवारी होणार पालखी पूजन 

The Khandoba Yatra of Malegaon will start from tomorrow | उद्या पासून होणार माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात

उद्या पासून होणार माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवस भरगच्च कार्यक्रम ड्रोन कॅमेरातून राहणार यात्रेवर नजर

नांदेड : मराठवाड्यातील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या माळेगाव येथील श्री म्हाळसाकांत तथा खंडोबा यात्रेस मंगळवारी २४ डिसेंबर रोजी देवस्वारी तथा पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे़ २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 

मंगळवारी सकाळी ११ वाजता श्री खंडोबाची पूजा होणार असून दुपारी २ वाजता देवस्वारी तथा पालखी पूजन आ़अशोक चव्हाण आणि माजी आ़ अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांची उपस्थिती राहणार असून यावेळी आ़श्यामसुंदर शिंदे, आ़मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे़ त्यानंतर ग्रामीण महिला व बालकांसाठी आयोजित स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती मधुमती देशमुख यांच्या हस्ते होणार आहे़ तसेच दुपारी अडीच वाजता अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषि प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांची उपस्थिती राहणार आहे़ 

२५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता समाजकल्याण सभापती शिलाताई निखाते यांच्या हस्ते विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे़ त्यानंतर सकाळी ११ वाजता आ़रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते पशू, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शनाचे उद्घाअन होणार आहे़ या कार्यक्रमाला कृषि व पशू संवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ 

२६ डिसेंबर रोजी गुरुवारी कै़दगडोजीराव देशमुख यांच्या स्मरणार्थ खंडोबा अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे़ सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे़ दुपारी २ वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आ़श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांची उपस्थिती राहणार आहे़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव असतील़ 

२७ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२़३० वाजता लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवाचे उद्घाटन खा़प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ़अमरनाथ राजूरकर राहणार आहेत़ २८ डिसेंबर रोजी शनिवारी पारंपरिक लोककला महोत्सवाला सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल़ याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ़श्यामसुंदर शिंदे असतील़ दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे़ पशूसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल़ या कार्यक्रमालाही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, उपसरपंच सुंदरबाई धुळगंडे यांची उपस्थिती राहील़  

ड्रोन कॅमेरातून राहणार यात्रेवर नजर
माळेगाव यात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांनी तयारी केली आहे़ यंदा या यात्रेसाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात असणार आहेत़ याबरोबरच विविध ठिकाणी फिरती शौचालये असणार आहेत़ भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यात्रा परिसरात चार वैद्यकीय पथकांसह सहा अ‍ॅम्बुलन्स तैनात ठेवण्यात येणार आहेत़ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही पथके भाविकांना आरोग्य सुविधा पुरवितील़ यात्रेसाठी येणाऱ्या पशूंच्या आरोग्यासंदर्भात सारंगखेडा यात्रा संयोजकांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली आहे़ त्यानुसार पशूसंवर्धन विभागाकडून औषधी पुरवठा करण्यात येणार आहे़ यावेळी श्रेणी १ आणि २ च्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक पशूची तपासणीही केली जाणार आहे़ यात्रास्थळी लातूर आणि नांदेड महानगरपालिकेचा प्रत्येकी एक अग्नीशमन बंब तैनात असणार आहे़ 

ग्रामपंचायतीकडील अधिकार आता गटविकास अधिकाऱ्यांना
यात्रेचे व्यापक नियोजन व्हावे यासाठी यात्रा नियोजनाचे ग्रामपंचायतीकडील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून लोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत़ दरम्यान, ग्रामपंचायतीकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने येथील वीजपुरवठा खंडित होता़ त्यामुळे यात्रेत पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती़ मात्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे़ त्यामुळे यात्रा कालावधीत ग्रामपंचायतीच्या नळ योजनेद्वारेच २४ तास पाणी पुरवठा सुरू राहणार आहे़ याबरोबरच जिल्हा परिषदेचे आठ पाणी टँकर दिमतीला राहणार आहेत़

Web Title: The Khandoba Yatra of Malegaon will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.