ऑफिसमध्ये घुसून पुण्याच्या वकिलाचे अपहरण; खुनानंतर मृतदेह तेलंगणात नेऊन जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 04:36 PM2023-01-05T16:36:53+5:302023-01-05T16:37:59+5:30
पुण्यात ऑफिसमध्ये घुसून वकिलाचे अपहरण; तिघांना अटक
देगलूर (जि.नांदेड) : पुणे येथील वकिलाचा अनैतिक संबंधाच्या संशावरून खून केल्याची बाब तपासात समोर आली असून, या प्रकरणात पुणे पोलिसांनी देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथील आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे.
पुणे येथील शिवशंकर दत्तात्रय शिंदे (४५) या वकिलाचा खून करून त्यांचा मृतदेह तेलंगणातील कोटचिर येथे पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी या प्रकरणात देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथील राजेश्वर गणपतराव जाधव (४२, ह.मु. कोळेवाडी पुणे) या आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करताना एका नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी घडली घटना
शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचे पुणे येथे काळेवाडीतील विजयनगरात कार्यालयात आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री आरोपींनी शिंदे यांचे कार्यालय गाठले. त्यावेळी त्यांच्यासोबत झटापट झाली. आरोपींनी शिंदे यांना मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधले. त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी बांधून एम.एच.१४/ए ८११६ या क्रमांकाच्या टेम्पोत टाकून देगलूरकडे आणले. शिवशंकर शिंदे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आढळला.
दहा दिवसांची कोठडी
या प्रकरणात पुणे पोलिसांनी देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथून बालाजी मारुती आयनलवार (२४) आणि सतीश माणिकराव इंगळे (२७) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ३ झाली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपींना पुणे येथील न्यायालयासमोर उभे केले असता, दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.