मूतखडा औषधनिर्मिती; जळगावच्या औषध कंपनीचा नांदेडच्या विद्यापीठाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 02:10 PM2020-10-30T14:10:04+5:302020-10-30T14:17:11+5:30
स्वारातीम विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलाने मूतखड्यावरील औषध गोळी स्वरूपात बाजारपेठेत आणण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता.
नांदेड : मूतखडा शरीरातच नष्ट करणाऱ्या औषधाची निर्मिती करण्यात नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला यश आले होते. विद्यापीठाने खाजगी कंपनीसोबत करार करून विद्यापीठातील हे संशोधन थेट बाजारपेठेत आणत राज्यातील अशा पद्धतीचे पहिले विद्यापीठ म्हणून मानही मिळविला होता. मात्र, संबंधित औषध कंपनीने नियम, अटींचे उल्लंघन करीत विद्यापीठालाच गंडा घातल्याने या कंपनीला विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
स्वारातीम विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलाने मूतखड्यावरील औषध गोळी स्वरूपात बाजारपेठेत आणण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता. सुरुवातीला उंदरावर आणि त्यानंतर १०० रुग्णांवर यशस्वी प्रयोग केल्यानंतर अन्न् व औषध विभागाची परवानगी घेऊन, तसेच भारत सरकारकडून डिसोपॉल या नावाने औषधाचे पेटंट घेऊन जळगाव येथील कलस या औषधनिर्मिती कंपनीशी करार करून विद्यापीठाने मूतखड्यावरील हे औषध बाजारपेठेत आणले होते. परिणामकारकता आणि खाजगी कंपनीच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे राज्यभरातून या औषधाला मागणीही वाढली. मात्र, कालांतराने तीन-साडेतीनशे रुपयांना मिळणारे हे औषध ७०० ते ७५० रुपयांना औषधी दुकानातून विकले जाऊ लागले. त्याचवेळी कंपनीने उत्पादन करून ते विद्यापीठाकडे सादर न करता त्याची परस्पर बाजारपेठेत विक्री केल्याने विद्यापीठाचे नियम व अटींचे उल्लंघन झाले. यामुळेच विद्यापीठाने या कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली होती.
नव्या कंपनीसोबत उत्पादन करण्यासाठीचे प्रयत्न
स्वारातीम विद्यापीठाने मूतखड्यावरील या औषधासाठी खाजगी कंपनीसोबत करार केला होता. मात्र, त्यांच्याकडून नियम, अटींचे उल्लंघन होत असल्याने नव्या कंपनीसोबत उत्पादन करण्यासाठीचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. करार संपल्यानंतर सदर कंपनी हे औषध बाजारात विकत असेल, तर कारवाई करू.
-डॉ. उद्धव भोसले, कुलगुरू, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड