कोकुलवार गोळीबार प्रकरण : पोलीस निरीक्षक दिघोरेंच्या अटकेने पोलीस दल हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:58 PM2020-01-11T13:58:07+5:302020-01-11T14:00:13+5:30
पोलीस दलातील अनेक कर्मचारी-अधिकारीही रडारवर
नांदेड : कुख्यात हरविंदरसिंघ ऊर्फ रिंधा संधू याच्याशी हितसंबंध असल्याच्या कारणावरून पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या अटकेने रिंधा आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे साटेलोटे उघडकीस आले आहे़ त्यात आता या प्रकरणात रिंधाशी संबंध ठेवलेले कर्मचारी आणि अधिकारी रडारवर आले आहेत़ त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे़
शहरात व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करण्यासाठी गुंडांकरवी गोळीबार करणाऱ्या रिंधाची मोठी दहशत निर्माण झाली होती़ कुख्यात रिंधावर नांदेड आणि पंजाब पोलिसांनी ११ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे़ आंतरराज्यीय कुख्यात गुंड म्हणून रिंधा याची ओळख असून खंडणीसाठी व्यापारी व प्रतिष्ठितांना तो धमकावत होता़ गेल्या काही वर्षांपासून रिंधाने नांदेडमध्येच बस्तान बसविले होते़
आॅगस्ट महिन्यात काँग्रेस कार्यकर्ते गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता़ या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली होती़ परंतु टोळीचा मुख्य सूत्रधार रिंधा असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ २७ डिसेंबर रोजी उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्ता विरेंद्र ऊर्फ सोपानराव कानोजी भंडारी याला अटक केली़ त्यानंतर भंडारीला दोन वेळेस मोक्का न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली़ भंडारीकडून पोलिसांनी ७ मोबाईल जप्त केले होते़ त्या मोबाईलच्या रेकॉर्डनुसार भंडारी हा रिंधाच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले़ यावेळी पोलिसांनी भंडारी याच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती़
गोविंद कोकुलवार यांचा मुलगा नागेश कोकुलवार याला धमकी दिलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला़ शहरात अनेकांना रिंधाने खंडणीसाठी फोन केले होते़ या खंडणी प्रकरणात भंडारी हा मध्यस्थी करीत होता़ भंडारीच्या चौकशीत या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गुंतले असल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांची चौकशी केली़ चौकशीनंतर दिघोरे यांचे रिंधाशी हितसंबंध असल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर दिघोरे यांना अटक केली आहे़ दिघोरे यांच्या अटकेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़ या प्रकरणात पोलीस दलातील आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी गुंतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ दुसरीकडे, भंडारी याच्यासोबत अनेक प्रकरणांमध्ये व्यवहार करणारेही अडचणीत आले आहेत़ भंडारी याच्या मोबाईलमध्ये पैसे देवाणघेवाण किंवा इतर संभाषणे असल्यास ते लोकही रडारवर आले आहेत़
दिघोरेंच्या कारवाया संशयाच्या भोवऱ्यात
स्थानिक गुन्हे शाखेत असताना दिघोरे यांच्या पथकाने जिल्हाभरात अनेक धाडसी कारवाया केल्या होत्या़ महत्त्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारीही दिघोरे यांच्याकडेच देण्यात येत होती़ परंतु आता रिंधासोबतच्या संबंधांमुळे दिघोरे यांनी केलेल्या कारवायाही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत़ दिघोरेंच्या कारवायांची चौकशी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़