कोकुलवार गोळीबार प्रकरणातील सहा जणांना जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:03 PM2020-07-18T20:03:08+5:302020-07-18T20:04:01+5:30
या प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़
नांदेड : काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार प्रकरणात औरंगाबादच्या मोक्का न्यायालयाने अटकेतील सहा आरोपींना जामीन नाकारला आहे़ त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते वीरेंद्र भंडारीसह पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांचा समावेश आहे़ या प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांकडून अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर केले होते़
१७ आॅगस्ट २०१९ रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार हे विणकर कॉलनी येथील आपल्या कार्यालयात असताना सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता़ त्यामध्ये कोकुलवार हे गंभीर जखमी झाले होते़ या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यात सर्वप्रथम बजरंग उर्फ योद्धा भीमराव नरवाडे (रा़ अंबाळा, ता़ हदगांव) याला अटक करण्यात आली होती़
सात जणांना केली होती अटक
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता़ धनंजय पाटील यांनी या प्रकरणात राजू देवराव राऊत, गुरुचरणसिंघ ऊर्फ लक्की संपूरणसिंघ गील, नाजिसोद्दीन ऊर्फ गुड्डू सय्यद मुनिरोद्दीन, सुभाष मोहन पवार, वीरेंद्र भंडारी, वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे या सात जणांना अटक केली होती़ दिघोरे हे पूर्वी नांदेडला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते़ आरोपींनी नांदेडातील अनेक बड्या मंडळींकडून खंडणी वसूल केली होती़ ही बाब पोलीस तपासात पुढे आली़ आरोपींवर त्यानंतर मोक्का लावण्यात आला होता़ यातील सहा आरोपींनी मोक्का न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे़ अटक झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांपासून हे आरोपी तुरुंगातच आहेत़