निवासी डॉक्टरांवर कोविडचा वाढता ताण, शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:14+5:302021-03-28T04:17:14+5:30
मागील वर्षभरापासून कोविडचा प्रसार वाढला आहे. त्यात मार्च २०२० मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नांदेडमधीलच नव्हे, तर राज्यातील ...
मागील वर्षभरापासून कोविडचा प्रसार वाढला आहे. त्यात मार्च २०२० मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नांदेडमधीलच नव्हे, तर राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या कार्याचे राज्य शासनानेही कौतुक केले; परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा कोविडच्या वाॅर्डात ड्यूटी करण्याची जबाबदारी निवासी डॉक्टरांवरच येऊन पडली आहे. कोविड काळात ड्यूटी करण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला नाही; परंतु त्यांच्या विशेष विषयांचा अभ्यासक्रम, शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, सराव आदी बाबींचा अभ्यास कधी करणार, असा प्रश्न निवासी डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. गतवर्षी मार्चपासून सुरू झालेला कोरोना २०२१ च्या मार्चमध्ये पुन्हा झपाट्याने वाढत आहे. परिणामी मागील वर्ष कोरोनामध्येच गेले आणि यापुढेही असेच राहिले तर शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न मार्ड संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १७८ निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी जवळपास चाळीस ते पन्नास डॉक्टरांना आठवड्यात कोविड वॉर्डात ड्यूटी असते. त्यात क्वारंटाइन पद्धत बंद केल्याने संबंधित डॉक्टरांकडून इतर वाॅर्डांतही सेवा दिली जात आहे. परिणामी इतर आजारांचे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत नांदेडच्या साठहून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोना हाेऊन गेला आहे, तर काही जण सध्या पॉझिटिव्ह आहेत. काही जणांना तर दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीतही राज्यातील सर्वच जीएमसीचे निवासी डॉक्टर कोविड वाॅर्डातही रुग्णसेवा देण्यास तयार आहेत; परंतु त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. पदव्युत्तर (एमओ, एमएस)चे शिक्षण तीन वर्षांचे असते. २०२० जवळपास कोरोना रुग्णांमध्ये गेले आणि पुन्हा २०२१ ही तसेच जात आहे. त्यामुळे एका वर्षात विशेष विषयाचा अभ्यास कसा करावा, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे.
शासनाने तयारी करायला हवी होती
आमच्या शैक्षणिक वर्षातील तीन वर्षांपैकी दोन वर्षे कोविडचे रुग्ण करण्यात गेले, तर विशेष विषयाचा अभ्यास कधी करायचा? जवळपास दोन वर्षांपासून पदव्युत्तरचे विद्यार्थी त्यांच्या विशेष विषयाच्या अभ्यासापासून दूर गेले आहेत. त्यामुळे आमचे करिअर धोक्यात आले आहे. सुरुवातीला कोविड काळात रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा केली; परंतु दुसरी लाट येणार हाेती. हे शासनाला माहिती होते, तर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती का केली नाही? - डॉ.प्रणव जाधव, अध्यक्ष मार्ड संघटना, नांदेड.