कृष्णूर धान्य घोटाळा : सहा महिन्यांत २५६ ट्रक धान्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 07:06 PM2018-09-29T19:06:36+5:302018-09-29T19:07:04+5:30

जुलैमध्ये घडलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात तपास अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागावरही मोठा ठपका ठेवला आहे.

Krishnur grain scam: In the six months, 256 truck grain disposal will be done | कृष्णूर धान्य घोटाळा : सहा महिन्यांत २५६ ट्रक धान्याची विल्हेवाट

कृष्णूर धान्य घोटाळा : सहा महिन्यांत २५६ ट्रक धान्याची विल्हेवाट

Next

बिलोली (नांदेड ) : जुलैमध्ये घडलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात तपास अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागावरही मोठा ठपका ठेवला आहे. बिलोली सत्र न्यायालयात तीनवेळा दिलेल्या अहवालात पुराव्याची साखळी कशी आहे हे नमूद करण्यात आले.परिणामी बिलोली, देगलूर व मुखेड येथील पुरवठा विभागाचे कर्मचारी तांत्रिक कचाट्यात आले आहेत. तीन तालुक्यांत सहा महिन्यांत जवळपास २५६ ट्रक शासकीय धान्याची विल्हेवाट इंडिया मेगा फॅक्टरीत झाली़

वेगवेगळ्या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला तेव्हा तपास अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक यांनी स्वत: हजर राहून अहवाल दिला. ज्यामध्ये अजय बाहेती, जयप्रकाश तापडिया, राजू पारसेवार, तुकाराम महाजन, ललित खुराणा यांच्यावर मुख्य आरोप आहे. यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात  पुरावे मिळाले. एफसीआयचे रेकॉर्ड तसेच तालुका गोदामवर ई- रजिस्टरवर असलेली नोंद तसेच दोन टप्प्यांतील झालेली वाहतूक पाहता अनेक ट्रक फक्त कागदोपत्रीच तालुका गोदामात गेले. वाहतूक ठेकेदारांच्या दलालांनी प्रत्येक तालुका पातळीवर सह्या करून माल पोहोचल्याचा दिखावा केला. वाहतूक ठेकेदार तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्ण मिलीभगत होती. शासकीय रेकॉर्डच्या नोंदी पूर्णत: बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचा पुरावा देण्यात आला. 

शासकीय धान्य कशा पद्धतीने काळ्या बाजारात जात होते याबाबतच्या पुराव्याची साखळी न्यायालयात स्पस्ट करण्यात आली. नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे सतत मोबाईलमधून दलाल, ठेकेदार, मध्यस्थ, व आरोपींच्या संपर्कात असल्याचे पुरावे मोबाईल विवरणावरून पुढे आले. यासाठी सर्व मोबाईल कंपनीशी संपर्क करून कॉल हिस्ट्री काढण्यात आली. जीपीएस प्रणालीसाठी सॅटेलाईटची मदत घेण्यात आली. बिलोली, देगलूर व मुखेड या मार्गावर प्रत्येकी दोन टोल नाके असल्याने पोलिसांना तपास सोपा गेला. 

सीसीटीव्ही कॅमेरा नुसारच्या   नोंदीमुळे  पुरावे हाती लागले. काळ्या बाजारात शासकीय धान्य लंपास करताना वाहतूक ठेकेदारांना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण मदत केल्याचे पुरावेही पोलिसांच्या अहवालात देण्यात आले आहेत.  त्यामुळे मुख्य आरोपी अटक झाल्यानंतर अधिकारी-कर्मचारीही कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. सध्या अधिकाऱ्यांची नावे पुढे आली नसली तरी जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्यांत कोण कोण पदावर होते त्यांची चौकशी केली जाणार आहे.  दरम्यान, बिलोली सत्र न्यायालयात मॅनेजर जयप्रकाश तापडिया याच्या जामिनावर शनिवारी निर्णय होणार आहे.

Web Title: Krishnur grain scam: In the six months, 256 truck grain disposal will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.