कृषिधन ! शेळीने पाच पिलांना दिला जन्म; शेतकऱ्याने गावभर पेढे वाटून केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 03:30 PM2021-01-29T15:30:21+5:302021-01-29T15:36:13+5:30
कमठालातांडा येथील रहिवासी गोविंद धुपा जाधव हे शेती करतात. त्यांनी शेतीला शेळी पालनाची जोड दिली आहे.
किनवट ( नांदेड ) : शेळीस जुळे किंवा तिळे जन्मलेले ऐकण्यात आले. मात्र, किनवट तालुक्यातील कमठालातांडा येथील एका शेतकऱ्याच्या शेळीने चक्क पाच पिलांना जन्म दिला आहे. बुधवारी ( दि. २७ ) जन्मलेले पाचही पिल निरोगी आणि सुदृढ आहेत. यामुळे शेतकऱ्याने गावभर पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.
तालुक्यातील कमठालातांडा येथील रहिवासी गोविंद धुपा जाधव हे शेती करतात. त्यांनी शेतीला शेळी पालनाची जोड दिली आहे. त्यांच्याकडे दहा शेळ्या आहेत. शेतीचे काही उत्पन्न आणि शेळ्यांची विक्री यावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. दहा शेळ्यांपैकी एका शेळीने बुधवारी ( दि. २७) चक्क पाच पिलांना जन्म दिला. त्यातील एक पाट असून चार बोकड आहेत. पाचही पिल्ल सुदृढ असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शेतकरी गोविंद जाधव यांनी मित्रमंडळीसह संपूर्ण गावात पेढे वाटून हा आनंद साजरा केला.
दरम्यान, शेळीने पाच पिल्लांना जन्म दिल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरली आहे. यामुळे अनेक ग्रामस्थ कुतुहलाने ही पिल्ल पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकांनी शेळीला जुळे, तिळे कधीतरी चार पिल्ल झाल्याचे पाहिल्याचे सांगितले. मात्र, शेळीला एकाच वेळी पाच पिल्ल होणे ही अभूतपूर्व घटना असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे.