किनवटचा विकास छप्पर फाडके करु-अशोकराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:26 AM2017-12-08T00:26:24+5:302017-12-08T00:27:09+5:30
शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.
किनवट पालिकेतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ दुर्गा मैदानवर आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे, जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, किशोर भवरे, माजी महापौर अब्दुल सत्तार,श्याम दरक, नारायण श्रीमनवार उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विकास केला. नांदेड मनपा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरभरुन विजयी केले. नांदेडची पुनरावृत्ती किनवटमध्ये झाली पाहिजे. फडणवीस सरकारकडे शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत.
घरकुलांसाठी पैसे नाहीत. व्याजमाफी नाही. हे सरकार फडणवीस नसून फसवणूक सरकार आहे. काँग्रेसच गरिबांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार आहे.काँग्रेसला ताकद दिल्याशिवाय गरीबांना न्याय मिळणार नाही. शहराच्या विकासासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.
भाजप सरकारने समाजातील सर्व घटकाला देशोधडीला लावले. महापालिका निवडणूक निमित्ताने सरकारबद्दलची नाराजी दिसून आली. अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास टाका. जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण करु, असे माजीमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी यावेळी सांगितले.