गांधी-आंबेडकरांच्या विचारांची कुरुंदकरांनी पेलली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:44 AM2019-02-11T00:44:50+5:302019-02-11T00:49:18+5:30
देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़
नांदेड : देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरुंदकर यांनी पेलली़ स्वातंत्र्य हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दत्ता भगत यांनी कुरुंदकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले़
येथील कुसुम सभागृहात रविवारी जि़प़अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या नरहर कुरूंदकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर आ़डी़पी़सावंत, ज्येष्ठ साहित्यिक भ़मा़परसावळे, डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़ फ़मुं़ शिंदे, प्रा़मधू जामकर, डॉ़मथु सावंत, जि़प़शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जि़प़सदस्य साहेबराव धनगे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर आदींची प्रमुख उपस्थिती होती़
नरहर कुरुंदकर यांनी विपुल लेखन केले़ ते असताना पंधरा पुस्तके प्रकाशित झाली होती़ मात्र त्यानंतर त्यांचे विपुल लेखन पाहून त्याच्या प्रकाशनासाठी प्रकाशन समिती नियुक्त करण्यात आली़ याची जबाबदारी माझ्यावर आली़ विशेषत: कोणत्या लेखनाला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे होते़ आज कुरुंदकर यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ३५ इतकी आहे़ कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा स्वातंत्र्य होते़ त्यामुळेच त्यांच्या लेखांचे पहिले पुस्तक स्वातंत्र्यविषयक आशय असलेले ‘अभयारण्य’ प्रकाशित करण्यात आले़ जंगलातले पशू आज मानवी वस्तीत शिरत आहेत़ कारण मनुष्य त्यांचे जग उद्ध्वस्त करायला निघाला आहे़ पशुंची संख्या अशी वाढली तर माणसांसाठी अभयारण्य निर्माण करण्याची वेळ येईल़ त्यामुळेच या पुस्तकाला अभयारण्य हे नाव दिल्याचे सांगत कुरुंदकर यांच्या विचारांचे तसेच दूरदृष्टीचे प्रा़दत्ता भगत यांनी कौतुक केले़ तत्पूर्वी भ़मा़परसावळे यांनीही कुरुंदकरांच्या लिखाणाचा गौरव केला़ नरहर कुरुंदकर हे निरपेक्ष तितकेच परखड समीक्षक होते़ सर्वच विषयांवर प्रभुत्व असलेले ते संपूर्ण विद्वान होते़ प्रत्येक प्रश्नाचा ते लेखणीच्या माध्यमातून छडा लावत असत़ कुरुंदकरांनी याच निर्भीडपणे इस्लामचीही चिकित्सा केली़ राष्ट्रीय पातळीवर इस्लामची इतकी स्पष्ट आणि परखड चिकित्सा त्यापूर्वी केवळ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती़, असेही परसावळे यावेळी म्हणाले़ कुरुंदकर यांनी लेखणीच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविल्याचेही त्यांनी सांगितले. आ़डी़पी़सावंत, प्राफ़़मुं़शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रास्ताविक शिक्षण सभापती माधवराव मिसाळे तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़
जिल्हा परिषदेकडून यांचा झाला गौरव
जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कुसुम सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा़दत्ता भगत, प्रा़ फ़मु़ंशिंदे, डॉ.भगवान अंजनीकर, भ़मा़परसावळे, प्रा़मधू जामकर, प्रा़मथु सावंत यांना नरहर कुरुंदकर पुरस्काराने गौरविण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्यक्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्याचा हा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ तो कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही यावेळी मान्यवरांनी काढले़