जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढला अन् प्राण गमावून बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:48 PM2023-07-03T19:48:58+5:302023-07-03T19:49:29+5:30
झारखंड येथून कामाच्या शोधात नांदेड येथे आलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
नांदेड: जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढलेल्या एका २३ वर्षीय तरूण मजुराचा विद्युत तारेचा 'शॉक' लागून मृत्यू झाल्याची घटना २ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेचे दरम्यान, विष्णूपुरी शिवारात घडली. जोगेंदर लालजी भुनिया असे मृत तरुणाचे नाव आहे.
झारखंड राज्यातील (गुरी ता. कटकमसाडी जि. हजारीबाग) येथील रहिवासी असलेला जोगेंदर लालजी भुनिया काही दिवसांपासून विष्णूपुरी (ता. नांदेड) येथे वास्तव्यास होता. दरम्यान, जोगेंदर रविवारी संध्याकाळी सात वाजेचे दरम्यान, जांभूळ खाण्याकरिता विष्णूपुरी शिवारातील झाडावर चढला. त्याचवेळी, जांभळाच्या झाडावरून गेलेल्या वाहिनीतील विद्युत तारेचा शॉक त्यास बसला. यामुळे जोगेंदर झाडावरून खाली कोसळला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी त्यास मृत घोषित केले, अशी माहिती ठाणे अंमलदार सपोउपनि. गंगाधर भालेराव व मदतनीस महिला अंमलदार पूनम उदगिरे यांनी दिली.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नूतन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोउपनि. शेषराव शिंदे हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.