धर्माबाद शासकीय रुग्णालयात यंत्रसामग्रीच्या अभावामुळे रुग्णांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:02+5:302020-12-04T04:50:02+5:30
धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे ...
धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे हलवावे लागत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय तर होतच आहे, त्याबरोबर आर्थिक फटका बसत आहे. याचा त्रास सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना होत आहे. हे रुग्णालय असून नसल्यासारखे असल्याने, या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांनी केले आहे.
धर्माबाद शहर हे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने नेहमीच विकासाच्या बाबतीत उपेक्षित आहे. धर्माबाद शहरात शासकीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाल्यापासून भव्य इमारत सोडली तर बाकी रुग्णालयात काही बदल झाला नाही. एक्स-रे मशीन असून नसलेल्या सारखे आहे. सोनोग्राफी, इतर मशनरी अद्याप नसून अनेक बाबींच्या घटना घडल्याने, तपासणी करता येत नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड तर होतेच, त्याबरोबर बाहेर हलविताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपघात, विविध प्रकारचे ऑपरेशन, महिलांचे सिझर ऑपरेशन, विविध, शस्त्रक्रिया, तात्काळ उपचार, नवजात अर्भक काळजी, कान, घसा, दंतरोग, नेत्ररोग, हृदयरोग व यासारख्या अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभावामुळे बारीक सारीख गोष्टीलाही बाहेर रुग्णांना हलवावे लागते. नांदेड शंभर, निझामाबाद पन्नास व हैदराबाद चारशे किमी अंतरावर असल्याने दोन ते आठ तासांचा अवधी लागत असल्याने अति गंभीर रुग्ण वेळेवर पोहोचत नसल्याने वाटेतच रुग्णाचा मृत्यू होत आहे. अशा अनेक घटना धर्माबादेत घडल्या आहेत.
त्यासाठी येथील शासकीय रुग्णालयाची इमारत भव्य असून परिसरही मोठा आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होण्यास भौगोलिदृष्ट्या काहीच अडचण होऊ शकत नाही. विविध तज्ज्ञ डॉक्टरांची व यंत्रसामग्रीची उपलब्धता होते. त्यामुळे रुग्णांना नांदेड, निजामाबाद यासारख्या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच मृत्यूदरातही घट होईल. त्यामुळे धर्माबाद मध्ये उपजिल्हा रुग्णालय ही आवश्यक बाब असून प्रशासनाने तातडीने ती मंजूर करणे गरजेचे आहे; पण सदरील मागणीस मूर्त स्वरूप येत नसल्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रमेश गौड यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी लावून धरली असून जनआंदोलन करण्याचा पवित्रा धरला आहे.