शौचालयाचा विसर; पाणंद रस्त्यावर घाण, अनेक शौचालयगृहे अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:55 AM2019-02-07T00:55:59+5:302019-02-07T00:57:36+5:30
पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़
हिमायतनगर : पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़
हिमायतनगर तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर यांनी प्रयत्न केले. तालुका पाणंदमुक्त झाला. संबंधित गावचे ग्रामसेवक, सरपंच यांनीही याकामी परिश्रम घेतले. १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत तालुका पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. या तारखेपर्यंत शौचालयांची कामे झाल्याचे दर्शविण्यात आले.
तालुक्यातील पवना, पवनातांडा, वाळकेवाडी, धन्वेवाडी, वडाचीवाडी, रामनगरसह अनेक गावांतील शौचालयांची कामे अर्धवट झाली. काही शौचालयांवर टीनपत्रे नाहीत, अनेक ठिकाणी शौच खड्डेच तयार नाहीत. त्यात रिंगाही नाहीत. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, मात्र दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
नागरिकांंनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी जनजागृती व्हावी, म्हणून २ गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती.
पथकाने अनेक गावांत पहाटे ५ वाजता भेटी देवून उघड्यावर बसणाऱ्यांना सुरुवातीला गांधीगिरी करुन फूल देत शौचालयाचे महत्त्व सांगितले. दुसºया भेटीत उघड्यावर बसाल तर पोलीस कारवाई करु, असा दम देण्यात आला. तालुक्यातील उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांनी युद्धपातळीवर लाभार्थ्यांच्या सहकाºयाने शौचालय बांधकाम केले खरे, मात्र जवळपास २० टक्के शौचालयांची कामे अर्धवट ठेवण्यात आली. ती पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांंनी केला.
आम्ही कामाचे मटेरियल दिले होते, ते आता चोरीला गेले आहे. हंगामी कामावर लाभार्थी गेल्याने कामे राहिली, असे वाळकेवाडीचे ग्रामसेवक शैलेश वडजकर यांनी सांगितले तर पवनाचे ग्रामसेवक बालाजी पोगूलवाड यांनी चार वेळा फोन घेण्याचे टाळले.
सर्व बाजू तपासून संबंधितांवर निश्चित करवाई केली जाईल, कामे पूर्ण केली जातील, असे बीेडीओ सुदेश मांजरमकर यांनी यावर सांगितले.