लाडाची लेक सीमेवर लढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:03+5:302021-08-22T04:22:03+5:30
नांदेड : आजच्या काळात लेकींनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. त्या-त्या क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. ...
नांदेड : आजच्या काळात लेकींनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. त्या-त्या क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. परंतु सैन्यात मात्र प्रवेशाचे मार्ग बंद होते. त्यातही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षाही देता येत नव्हती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने स्त्री-पुरुष समानतेची आज भाषा करीत असताना एनडीएची परीक्षा महिला असल्यामुळे देता येणार नाही हे योग्य नाही, असे नमूद करीत तरुणींनाही यापुढे आता एनडीएची प्रवेश परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशसेवेची ऊर्मी असलेल्या तरुणींसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहे. केवळ त्या महिला असल्यामुळे त्यांना या परीक्षेपासून किंवा लष्करात भरती होण्यापासून रोखता येणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे लष्कराचे दरवाजे आता मुलींसाठीही खुले झाले असून, आपणही पुरुषांप्रमाणेच देशाच्या सीमांचे रक्षण जीवाची बाजी लावून करू शकतो, हे सिद्ध करता येणार आहे.
एनसीसीमध्ये मुले आणि मुली असतात. आजघडीला देशात प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली काम करीत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसाही उमटविला आहे. असे असताना एनडीएची परीक्षा देता येणार नाही, हे थोडे वेगळेच वाटत होते. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयाने या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करते.
- शुभांगी पवार
गेल्या अनेक वर्षांपासून एनडीएबाबत ऐकत आलो आहे. परंतु यामध्ये कधीच तरुणी दिसल्या नाहीत. त्यामुळे सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकांचे भंगले आहे. आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अधिकची तयारी करून एनडीएची प्रवेश परीक्षा देणार आहे. कुटुंबीयांनाही आपला निर्णय सांगितला आहे. त्यांनीही या परीक्षेसाठी प्रोत्साहनच दिले आहे.
- प्रिया राऊत