महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा; प्रशासनाचा विचित्र कारभार
By श्रीनिवास भोसले | Published: August 22, 2023 11:16 AM2023-08-22T11:16:25+5:302023-08-22T11:16:49+5:30
शासनाचा अजब फतवा, की केंद्रावरील अधिकाऱ्यांची मनमानी?
श्रीनिवास भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : तलाठी परीक्षेत महिला परीक्षार्थ्यांसाठी अजब फतवा काढण्यात आला. त्यामुळे चक्क सौभाग्यवती महिलांना जोडवे, बांगड्या अन् मंगळसूत्र काढून सोमवारी परीक्षेला सामोरे जावे लागले. पहिल्याच श्रावण सोमवारी सौभाग्याचे अलंकार काढावे लागल्याने महिला परीक्षार्थ्यांनी या धोरणाचा निषेध नोंदविला.
वाढीव शुक्ल, दूरचे केंद्र, हायटेक कॉपी आणि सर्व्हर डाऊन... अशा अडचणींमध्ये महिलांना दागिने काढून ठेवण्याचा फतवा काढण्यात आला नांदेडमधील अनेक केंद्रांवर हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त करण्यात आला.
बांगड्या फोडल्या, जोडवे तोडले..
एकीकडे दागिने काढण्याची कसरत तर दुसरीकडे होणारा रिपोर्टिंग टाइम यामुळे अनेकींनी अक्षरश: दगडाने बांगड्या फोडल्या तर जोडवे अडकित्त्यांनी तोडून काढले. परिणामी महिलांना या प्रसंगात अश्रू रोखता आले नाही. ऐन श्रावण सोमवारी अलंकार काढून ठेवण्याची वेळ या अजब फतव्यामुळे ओढवली.
नांदेड, अमरावती केंद्रांवर घडला प्रकार
नांदेडसह अमरावती जिल्ह्यातील केंद्रांवर अलंकार काढण्यास सांगितले. हा नियम शासनाने घालून दिला की केंद्रावरील यंत्रणेचा कारभार होता? हा प्रश्न आहे. परंतु, परीक्षेच्या नियमावलीत कुठेच अलंकार काढून ठेवण्याचा उल्लेख दिसत नाही. अलंकारांवर पांढरा टेप काही परीक्षा केंद्रांवर मंगळसूत्र, जोडवे, डोरले अंगावर ठेवण्यात आले. मात्र हे अलंकार पांढऱ्या चिकटपट्टीने झाकून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कॉपी रोखण्यासाठी हे केल्याचे सांगितले जात असले तरी यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
मम्मीचा पेपर अन् पप्पांची ‘परीक्षा’
परीक्षेसाठी वर्गखोलीत गेलेल्या महिलामंडळीने आपल्या चिमुकल्यांना मात्र नवरोबांकडे सोपवून दिले होते. त्यामुळे मम्मीचा पेपर अन् पप्पांची ‘परीक्षा’ असे चित्र अनेक केंद्रांवर दिसले.
आधी १ हजार रुपये शुल्क आणि आता बॅग ठेवण्यासाठी २० रुपये
छत्रपती संभाजीनगर : तलाठी परीक्षेसाठी उमेदवारांनी १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरही चिकलठाणा एमआयडीसीतील आयवॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात युवकांकडून बॅग ठेवण्यासाठी २० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्याशिवाय केंद्रात स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची माहिती परीक्षार्थींनी दिली. दररोज तीन शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे. सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजताच पहिल्या सत्रातील परीक्षा होणार होती. सकाळी ८ वाजता केंद्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षात ११ वाजता सुरू झाली. तेथून पुढे १ वाजेपर्यंत पेपर चालला.