पुराच्या पाण्याने लख्खा, तूपशेळगाव गावांचा संपर्क तुटला; पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 06:31 PM2024-07-25T18:31:46+5:302024-07-25T18:35:51+5:30
मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.
- शेख शब्बीर
देगलूर: पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडल्याने पुरात रस्ता पाण्याखाली जाऊन आज सकाळपासून लख्खा व तूपशेळगाव या गावांचा संपर्क तुटला. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गावचा संपर्क तुटून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. लख्खा या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन पूलाचे बांधकाम अनेक वर्षापासून रखडले आहे. जोरदार पाऊस झाल्याने दोन्ही पुलावरून पुराचे पाणी वाहते आहे. यामुळे गुरुवारी सकाळपासून लख्खा आणि तूपशेळगाव या गावांचा संपर्क तुटला. दुपारनंतर तुपशेळगाव येथील पुराचे पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याचे देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच
१९८३ च्या महापुरानंतर पुनर्वसन करण्यात आलेल्या लख्खा गावाची लोकसंख्या जवळपास १५०० च्या आसपास आहे. या गावाला जोडणाऱ्या दोन पूलांचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात खानापूर, सुगाव, इब्राहिमपूर या शिवारातील पाणी येऊन या पुलावरून वाहते.त्यामुळे पूर स्थिती निर्माण होऊन लख्खा गावाचा संपर्क तुटणे ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना गावातून बाहेर पडणे कठीण होते. एखाद्या वेळेस गावातील नागरिकांना आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. गावातील जवळपास ३०० मुले शिक्षणासाठी वन्नाळी, देगलूर या ठिकाणी जातात तर गावातील काही नागरिकांना रोजगारानिमित्त देगलूरला यावे लागते मात्र येथील दोन पुलाला पाणी आले की पालकांचा जीव टांगणीला लागतो. प्रसंगी मुलांना वन्नाळी येथील गुरुद्वारात मुक्कामी थांबवावे लागते .
गिरीश महाजन यांच्या आश्वासनास वर्ष लोटले
विशेष म्हणजे जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तालुक्यातील लख्खा, वन्नाळी,व सुगाव परिसराला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत लख्खा येथील दोन पूलांचा प्रश्न येत्या सहा महिन्यात निकाली काढू असे आश्वासनही महाजन यांनी दिले होते. या आश्वासनाला वर्ष होत आले मात्र परिस्थिती जैसे थे च असल्याने गावकऱ्यांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.