रेशीम शेतीने बनविले लखपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:56 AM2018-10-17T11:56:16+5:302018-10-17T11:57:04+5:30
यशकथा : व्यवसायाने डॉक्टर असलेले बी.आर. हिंगमिरे यांनी तीन हेक्टर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून हळद, रेशीम शेतीमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे
- सुनील चौरे (हदगाव, जि. नांदेड)
सध्या बडे-बडे शेतकरी, पिढ्यान्पिढ्या शेती करणारे शेतकरीशेतीला कंटाळले आहेत. पिकांना योग्य दर मिळत नाही, खर्चाच्या तुलनेत उत्पादनात होणारी घट, यामुळे शेतकरी त्रस्त बनले आहेत. यातून नैराश्य येऊन काही जणांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारला. मात्र, व्यवसायाने डॉक्टर असलेले बी.आर. हिंगमिरे यांनी तीन हेक्टर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून हळद, रेशीम शेतीमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
डॉक्टरांचा जन्म एका कष्टकरी कुंटुबात झाल्याने शेतात काही तरी वेगळा उपक्रम राबवावा, असा विचार हिंगमिरे यांच्या मनात आला. मात्र, त्यांना वडिलोपार्जित शेती नव्हती. व्यवसाय डॉक्टरकीचा असल्याने शेतीचा जोडधंदा न जमणारा होता. एलआयसीच्या माध्यमातूनही त्यांचा चांगला संपर्क होता. या व्यवसायातून बचत करीत त्यांनी सात एकर (अडीच हेक्टर) जमीन विकत घेतली. कोरडवाहू व खरबाड (हलक्या प्रतीची) जमीन असल्याने जमिनीला पाण्याची गरज होती. त्यानंतर त्यांनी जमिनीत विहीर खोदली. विहिरीला पाणी जेमतेमच लागले. ७ एकर जमीन विहिरीच्या पाण्यावर जोपासणे शक्य नसल्याने डॉ. हिंगमिरे यांनी पुन्हा शेतात बोअरवेल घेतला. दैवाने त्यांंना चांगली साथ दिली. बोअरवेलला चांगले पाणी लागले.
त्यानंतर २५०० ट्रिप तळ्यातील गाळ, काळीमाती टाकून जमिनीची उत्पादन क्षमता त्यांनी वाढविली. जमिनीत त्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेतीला सुरुवात केली. २०१६ मध्ये डॉ. हिंगमिरे यांनी प्रथम तुतीची लागवड केली. २०१७ मध्ये एक क्रॉप ८५ किलो, १०० अंडीपुंज यांना ५०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळाला. यातून त्यांनी ४४ हजार २०० रुपये कमावले. आॅक्टोबर २०१७ मध्ये दुसरा क्रॉपनुसार ८५ किलो व ५०० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे ४४ हजार २०० रुपये पुन्हा मिळाले. तिसरा क्रॉप ७६ किलो मिळाला. त्याचे एकूण २५ हजार ८४० रुपये मिळाले. वर्षांकाठी एक एकर शेतीमध्ये त्यांना एक लाख रुपये प्राप्त केले. यावर्षी त्यात वाढ करीत डॉ. हिंगमिरे यांनी तीन हेक्टरमध्ये तुतीची लागवड केली आहे.
७ सप्टेंबर २०१८ रोजी २०० अंडीपुंजाला २३५ रुपये प्रतिकिलो भाव मिळून त्यांनी ३३ हजार ९१५ रुपये मिळविले. यानंतर त्यांंनी दीड लाख रुपये खर्च करून शेड बांधला. रेशीम शेतीला जोड म्हणून हळदीचे यशस्वी उत्पन्न घेतले. दोन एकरमध्ये ६५ किलो हळद झाली. त्यासाठी गांडूळखत, सोबत आरसीएफचे १९:१९:०, डीएपी आणि गोमूत्र (पंचामृत) याचा वापर करून हळदीला प्रतिक्विंटल ७४०० रुपये दर मिळून एकूण ४ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्याच शेतीत १० किलो सोयाबीनची लागवड केली. यातून २७ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळवून त्यांनी ७२ हजार ९०० रुपये प्राप्त केले. शेतात वेगवेगळे उपक्रम राबवून उत्पन्न घेण्याचा डॉ. हिंगमिरे यांचा कल असतो.