नांदेड जिल्ह्यात ‘लंपी स्कीन’ अन् ‘कोरोना’ सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:30 PM2020-09-09T18:30:49+5:302020-09-09T18:34:28+5:30
लंपी स्किन हा रोग विषाणूजन्य असून माशा आणि डास यापासून प्रसार पावतो़ यामुळे गोठ्यातील माशा आणि डासांचा नायनाट करणे अत्यंत गरजेचे आहे़
नांदेड : जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने त्रस्त झाले असताना ‘लंपी’ नावाच्या आजाराने जनावरांनाही घेरले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे ‘लंपी’ असे विदारक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. दोन्ही बाबतीत प्रशासनाची भूमिका मख्खपणाची असल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.
जुलैच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात अडीचपट वाढ
कंधार : तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर कोरोनाचा शिरकाव होण्यास तीन महिने लागले. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मोजकेच रूग्ण सापडले. जुलै महिन्यात वाढ होऊन ६८ रूग्ण आढळले. परंतु, आॅगस्ट महिन्यात जुलैमधील रूग्णांच्या सुमारे अडीच पट म्हणजे १६३ रूग्ण आढळले. जून महिन्यात अवघे ५ रूग्ण आढळले. जुलै महिन्यात मात्र त्यात लक्षणीय वाढ होऊन संख्या ६८ वर पोहोचली. आॅगस्टमध्ये विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला़ १६३ नवीन रुग्ण झाले. ही संख्या जुलैच्या तुलनेत सुमारे अडीच पट वाढल्याचे दिसून येते. सप्टेंबर महिन्यात ६ दिवसांत नवीन ५४ रूग्णाची भर पडून एकूण संख्या २९० झाली. नागरिकांची मनमानी वाढत राहिली व प्रशासनासह सर्व विभागाचा कानाडोळा होत राहिला तर संसर्ग सुसाटपणे वाढणार आहे, हे निश्चित आहे.
ऐन हंगामाच्या काळात शेतकरी त्रस्त
बिलोली : शहरापासून सुरु झालेला कोरोनाचा कहर आजघडीला ग्रामीण भागापर्यंत पोहोचला तर ऐन शेतीच्या हंगामात या रोगाने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. दरम्यान, लंपी स्कीन आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे संकटाच्या या काळात शेतकरी अडचणीत सापडला आहे. ‘लंपी’मुळे जनावरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी रात्रंदिवस उपचार करीत असले तरी या आजारामुळे शेती व्यवसायाचा कणाच मोडला आहे. तर तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यु, लॉकडाऊन करण्यात आले. सर्व करुनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल ३०० हून अधिक बाधितांची संख्या वाढली असून सध्यास्थितीत ९० च्या जवळपास उपचार घेत आहेत. एकीकडे रोजगार नाही. हाताला काम नाही, अशी अवस्था कोरोनाने केली. आता शेतकरी हा जनावरावरील लंपी रोगामुळे अडचणीत सापडला आहे.
किनवट तालुक्यात ३९ कोरोना बाधित
किनवट : किनवट तालुक्यात सोमवारी ३९ नव्या रुग्णांची भर पडली़ तालुक्यात आतापर्यंत २८३ बाधित रुग्ण आढळले आहेत़ यातील १२० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले़ आजघडीला गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेट कोविड सेंटर येथे ३८, किनवट येथील सेंटरमध्ये ६३ असे एकूण १०१ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ संजय मुरमुरे यांनी दिली़
मुदखेड तालुक्यातील पाच गावांत लंपी स्कीन
मुदखेड: तालुक्यातील डोणगाव, मेंडका, निवघा, चिकाळा, बतकलवाडी आदी गावांत लंपी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला असून जनावरांवर औषधोपचार व लसीकरण सुरु केल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.बी. बी. बुचलवार यांनी दिली. या आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून गोठ्यात निर्जंतुकीकरण करावे, गोठ्यांची फवारणी एक लिटर पाण्यात १० मिलि करंज, तेल १० मिलि निम तेल व २० ग्रॅम साबणाची वडी टाकून मिश्रित द्रावणाने किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या निर्जंतुकीकरण द्रवणाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा गोठ्यांची फवारणी करावी़ सदर परिसर स्वच्छ ठेवून बाधित जनावरांचा त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावा, बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे, जनावरांना चारा, पाणी वेगळा करावा़ सध्यातरी या रोगावर लस उपलब्ध नाही़ परंतु, लशीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत़
लंपी स्किन हा रोग विषाणूजन्य असून माशा आणि डास यापासून प्रसार पावतो़ यामुळे गोठ्यातील माशा आणि डासांचा नायनाट करणे अत्यंत गरजेचे आहे़ हा रोग संसर्गजन्य असला तरी मरतुकीचे प्रमाण फारच नगण्य असल्याने पशुपालकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा उपलब्ध पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बाधित जनावरांचा उपचार करून घ्यावा, असे आवाहनही डॉ.बुचलवार यांनी केले.वेळीच उपचार केल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, अशी माहिती डॉ. बुचलवार यांनी दिली़
बिलोली तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात पशू-वैद्यकीय विभागाच्या टीमने सर्व शेतकऱ्यांना लंपी रोगाविषयी जनजागृती, घ्यावयाची काळजी आदी माहिती दिली असून शेतकऱ्यांनी जनावरांना लक्षणे दिसताच पशू-वैद्यकीय विभागाला संपर्क करावा - डॉ.शंकर उदगीरे, पशुवैद्यकीय अधिकारी बिलोली.
बिलोली तालुक्यात सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोनाला तालुक्याबाहेर रोखण्यासाठी सर्दी,ताप,खोकला आदी असेल तर कोविड सेंटरला भेट द्या -डॉ.नागेश लखमावार, अधीक्षक ग्रा.रु.बिलोली