मागील २० दिवसांत १४३ जणांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:26+5:302021-03-31T04:18:26+5:30
नांदेड : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेरोनाचा कहर वाढला आहे. त्यात काही दिवसांपासून कोरोनाने मृत्यू होण्याची संख्याही ...
नांदेड : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेरोनाचा कहर वाढला आहे. त्यात काही दिवसांपासून कोरोनाने मृत्यू होण्याची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. २९ मार्च रोजी उच्चांकी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात मागील वीस दिवसात जवळपास १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ११२ जणांचा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, नागरिकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने प्रशासनाने नांदेडात २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावला आहे. त्यानंतरही अनेक जण गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत काही प्रमाणात किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठीची मुभा दिली आहे. त्याचवेळेत ठराविक ठिकाणी प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.
नांदेड शहरात कोरोनाला रोखण्यास मार्च २०२० मध्ये प्रशासनाला यश आले होते. पहिले काही दिवस नांदेड ग्रीन झाेनमध्ये राहिले. परंतु, यंदाच्या मार्चमध्ये नांदेडने देशातील टाॅप टेन शहरामध्ये नंबर लावला आहे. दिवसाकाठी हजारावर रूग्ण आढळून येत आहेत. त्यात प्रशासनाच्यावतीने कोरोना चाचण्याही वाढविल्या आहेत. दिवसाकाठी साडेचार ते पाच हजार चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रूग्णाबरोबरच मृत्यूचेही प्रमाण वाढले असून दररोज दहा ते पंधरा मृत्यू होत आहेत. मागील पाच दिवसात हा आकडा वाढतच असून २९ मार्च रोजी उचांकी १९ मृत्यू झाले. नांदेडच्या गोवर्धन घाट येथे स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी वेटींग असून नंबर लावला तर दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी पिंजरा मिळत आहे. अथवा खाली मिळेल त्या जागेवर सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.