नांदेड येथे पाईप चोरी प्रकरणात ठेकेदारास अंतिम नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:38 PM2018-03-13T18:38:32+5:302018-03-13T18:38:58+5:30
जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे.
नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत योग्य बाजू न मांडल्यास हे काम रद्द करुन ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या प्रभाग १४ होळी येथे दलित वस्ती निधीतून २० लाख ७४ हजार रुपयांचे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामावर वापरण्यात येणारे पाईप चोरीचे असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी ५ मार्च रोजी १४ पाईप जप्त करीत एका प्लंबरला ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणात पाईप चोरांचे आंतरराज्यीय रॅकेटच समोर आले आहे. तेलंगणातील तीन पाईप कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नांदेडमध्ये येवून विविध भागातील पाईपांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात तिन्ही कंपन्यांचे चोरुन आणलेले पाईप नांदेडात आढळले आहे. इतवारा पोलिसांनी हे पाईप जप्त केले आहेत.
महापालिकेनेही या प्रकरणात सावध भूमिका घेताना ८ मार्च रोजी सदर काम बंद करण्याचे ठेकेदारास पत्र दिले तर ९ मार्च रोजी या कामासाठीचे पाईप खरेदीचे देयक सादर करण्याचे आदेश दिले. तीन दिवसानंतरही सदर काम करणार्या सोहेल कन्स्ट्रक्शनने पाईप खरेदीचे देयक महापालिकेपुढे सादर केले नाहीत. परिणामी ही खरेदी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात पोलिसांकडून मागील तीन दिवसांपासून जुन्या नांदेडातील विविध भागातून पाईप जप्ती सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणात १२ मार्च रोजी महापालिकेने मे. सोहेल कन्स्ट्रक्शन अॅन्ड स्टील वर्क्स या कंत्राटदारास अंतिम नोटीस बजावली आहे. पाईप खरेदी देयकांची मागणी करुनही आतापर्यंत सादर केले नाही. यामुळे या प्रकरणात संशय वाढल्याचे स्पष्ट केले आहे. ही पाईप खरेदी संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शिनी दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणात इतवारा पोलिसांनी सोमवारी पाईप जप्ती झाली नसल्याचे सांगितले. त्याचवेळी या प्रकरणात पाईप कंपनी निर्मल पोलिसांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. या प्रकरणातील धागेदोरे लवकरच पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाईप चोरीस ठेकेदाराची मूक संमती?
महापालिकेने सोहेल कन्स्ट्रक्शनला बजावलेल्या नोटीसमध्ये पाईप चोरीच्या आरोपास मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे. सदर पाईपची खरेदी नियमानुसार झाली नसल्याचे गृहीत धरण्यास भरपूर वाव झाल्याने आपणास दिलेले काम रद्द करुन आजपर्यंत टाकलेले सर्व पाईप खोदून चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात का देवू नये? या प्रकरणात महापालिकेच्या झालेल्या मानहानीस आपणास जबाबदार धरुन आपला ठेका रद्द का करु नये? तसेच आपणास काळ्या यादीत का टाकू नये? अशी नोटीस महापालिकेने बजावली आहे. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.