नांदेड जिल्ह्यात महारेशीम अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:24+5:302021-02-11T04:19:24+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी रेशीम अभियान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वस्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेतीबाबत ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी रेशीम अभियान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वस्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेतीबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी माहितीने सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. रेशीम शेतीविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी रेशीम रथासोबत रेशीम अधिकारी, तज्ज्ञ कर्मचारी विविध गावांत मार्गदर्शन करणार आहेत. रेशीम विभाग व कृषी सहायक यांच्या मदतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन रेशीम शेती तसेच मनरेगा, पोकरा, आत्मा यासारख्या आनुषंगिक योजना शेवटच्या पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधिताना दिले.
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे, रेशीम विकास अधिकारी श्रीमती ए. व्ही. वाकुरे, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, सहायक लेखाधिकारी सतीश देशमुख, सहदेव वाघमोडे, प्रसाद डुबूकवाड, वरिष्ठ तांत्रिक सहायक ए.जे.कारंडे, पी.एस.देशपांडे, टी. ए.पठाण, एस.जी. हनवते, पी.यू. भंडारे, एस.पी.इंगळे, एन. वाय. कोरके, ए. एन.कुलकर्णी, के.के. मेहकरकर, गणेश नरहिरे, रावसाहेब पोहरे, संतोष निलेवार, गोपाळ धसकनवार, बाळासाहेब भराडे आदी उपस्थित होते.
रेशीम शेतीत कामाची मजुरी देणार शासन -
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना तुती लागवड व जोपासना मजुरी व साहित्य खर्चापोटी तीन वर्षांत टप्पेनिहाय २ लाख १३ हजार १० रुपये, तर कीटक संगोपनगृह बांधण्यासाठी १ लाख १३ हजार ७८० रुपये असे एकूण ३ लाख २६ हजार ७९० रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, नवा मोंढा नांदेड येथे नोंदणी करावी, अथवा ०२४६२-२८४२९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.