विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी निवडणुका थांबल्याने नवनेतृत्व निर्मिती प्रक्रियेस खीळ - जयदेव डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:12 AM2018-01-23T00:12:17+5:302018-01-23T11:27:22+5:30
महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.
नांदेड : महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर होणा-या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधून नवनवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र ही निवडणूक प्रक्रिया थांबल्याने नवे नेतृत्वही विकसित होत नसल्याचे सांगत त्यामुळेच घराणेशाहीलाही चालना मिळाल्याचे माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी सांगितले.
येथील पीपल्स कॉलेजच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्मृती व्याख्यानमालेत ‘लोकशाहीची वार्ता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. सदाशिवराव पाटील होते. यावेळी महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. देवरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सध्याच्या काळात राजकारण निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी चाललेला खेळ झाले आहे. त्याला जी विचारांची आणि तत्त्वांची बैठक लागते ती नाहीशी झाली असून ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असल्याचे परखड मतही प्रा. डोळे यांनी व्यक्त केले.
निर्णय प्रक्रियेसंदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचली तरी मतदारांना विविध उमेदवारांमधून निवड करणे सोपे जाईल. परंतु आजकाल माध्यमांतून राजकारणाची नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात पुढे आणली जात आहे. त्यामुळे जनमाणसात राजकारणाबद्दल तिटकारा निर्माण होत असल्याचे सांगत राजकारणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रा. डोळे यांनी व्यक्त केली.
समारोपात पाटील यांनी डॉ. डोळे यांची लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांवर निष्ठा होती. ही मूल्ये त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्याने भारतीय लोकशाहीला बळ मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. तर प्राचार्य दवरे यांनी डॉ. ना. य. डोळे यांनी आवर्जुन मराठीतून राज्यशास्त्र विषयातील विपूल ग्रंथनिर्मिती केल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला संस्था सचिव प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, डॉ. सी. के. हरनावळे, शंतनू डोईफोडे, दीपनाथ पत्की, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य देवदत्त आणि प्रा. शारदा तुंगार, प्रा. मधुकर राहेगावकर, डॉ. जीवन पिंपळवाडकर, प्रा. लक्ष्मण कोतापल्ले, प्रा. डॉ. ललिता अलसटवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अशोक सिद्धेवाड, सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल दहीफळे तर डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले.