पुढाऱ्यांना प्रचाराची तर शेतकऱ्यांना मशागतीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:54 AM2019-04-07T00:54:11+5:302019-04-07T00:57:08+5:30
तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे.
कंधार : तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे. पुढारी प्रचारासाठी कार्यकर्ते अन् शेतकरी सालगड्याचा शोध घेण्यात गुंतला असल्याचे चित्र आहे. राजकारण व शेतीकारण मनधरणीत अडकले असल्याचे मानले जात आहे.
तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी दुष्काळामुळे वीटकाम, बांधकामासाठी हंगामी स्थलांतर केले आहे. निवडणूक मतदान तारीख जवळ येत आहे. परंतु, पक्ष कार्यकर्ते झपाटून प्रचारात उतरले नाहीत. त्यामुळे उमेदवार व पक्षनेत्यांना मोठी चिंता सतावत असल्याचे चित्र आहे. उपलब्ध कार्यकर्ते वाढत्या तापमानाने बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पुढा-यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत आहे.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती अतंर्गत असलेले ७७ मतदान केंदे्र मुखेड विधानसभेला जोडली आहेत. हा मतदारसंघ नांदेड लोकसभेत आहे. तसेच ६९ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली १३४ मतदान केंदे्र लोहा विधानसभेला जोडली आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभेला जोडला आहे. त्यामुळे कार्यकर्ते जुळवताना पुढाºयांना कसरत करावी लागत आहे.
गत काही वर्षांपासून शेतकºयांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सिंचन शेतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने कोरडवाहू शेती आणि निसर्गपावसावर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. दुष्काळाने शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय हा चारा, पाणी यामुळे अडचणीत अडकला आणि सालगड्याचे भाव वाढल्याने आर्थिक खर्च पेलवत नाही. अशा नानाविध समस्यांनी शेतकरी चिंतीत आहे. शेती अनेक समस्यांनी कितीही अडचणीत आली तरीही बळीराजा काळ्या आईवर कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी अवलंबून असतात. दुष्काळ, शेती मशागत, लागवड खर्च, पाऊस, उत्पादन, उतारा, शेतमाल भाव, मजुरांचे वाढते भाव आदींचा ताळमेळ लागत नाही. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकºयांना सालगडी लागत नाही. परंतु, २ हेक्टरवरील शेतकºयांना सालगडी मिळत नाही.
सालगड्याचे भाव ८० हजार ते १ लाख असे आहेत. त्यात पुन्हा सिंचन शेती व जास्त शेती असेल तर लाखाच्या वर भाव असतात. अनेक शेतमजूर सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा ऊसतोडणी, वीटकाम, बांधकाम आदींकडे कल वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना मनधरणी करावी लागते. शेतकरी गुढीपाडव्याच्या दिवशी पेरणीपूर्व मशागत कामाला सुरूवात करतात. परंतु, सालगडी शोधताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांची मनधरणी करावी लागत आहे.
तालुक्यात ६० हजारांपेक्षा अधिक खातेदाराची संख्या आहे. अल्प, अत्यल्पभूधारक खातेदार वगळता २ हेक्टरपेक्षा अधिक खातेदारसंख्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त आहे, अशा बहुतांश शेतक-यांना सालगडी शोधताना व मनधरणी करताना कसरत करावी लागत आहे.