अनेक पक्षांची नेते बोंढारच्या दिशेने; पोलिसांच्या तगड्या बंदोबस्ताने गावाला छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:05 PM2023-06-05T14:05:37+5:302023-06-05T14:06:16+5:30
गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
नांदेड : वादानंतर बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. दररोज गावात अनेक पक्षांचे नेते भेटी देत आहेत. त्यामुळे गावाला छावणीचे रूप आले आहे.
१ जून रोजी बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव आणि त्याचा भाऊ किराणा दुकानात थांबले होते. यावेळी लग्नाची वरात जात असताना काही जणांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्यातून झालेल्या वादातून अक्षय भालेरावचा भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. मयत अक्षयच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दररोज राज्यभरातील नेते गावात दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यासाठी गावातच तात्पुरत्या स्वरूपात पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. तसेच गावात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.