नववीत शाळा नको म्हणून घर सोडले, 'बीए' ला प्रवेश घेताच आधारसाठी फोन केला अन सापडला
By शिवराज बिचेवार | Published: September 20, 2022 06:35 PM2022-09-20T18:35:05+5:302022-09-20T18:35:44+5:30
घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता.
नांदेड : आई-वडील शाळेत जाण्याचा तगादा लावत असल्याने इयत्ता नववीतील मुलाने घर सोडले. जवळपास साडेचार वर्षांपासून तो बेपत्ता होता. परंतु, याच काळात कोणत्याही वाईट वळणाला न लागता त्याने बी. ए.पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरी वडिलांना आलेल्या एका निनावी फोनवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलाचा शोध लावला. मुलाला समोर पाहताच आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
नागोबा ज्ञानोबा पेद्दे (रा. भोसी, ता. बिलोली) यांचा मुलगा ज्ञानेश्वर याला शाळेत जाण्याचा कंटाळा होता. नववीत असताना शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडायचा अन् गावभर फिरायचा. ही बाब नागोबा पेद्दे यांना कळल्यानंतर त्यांनी शाळा गाठली. परंतु, वडिलांना समोर पाहताच ज्ञानेश्वरने धूम ठोकली. तो घरी परत आलाच नाही. पेद्दे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. परंतु, त्याचा शोध लागत नव्हता. ही घटना १६ मार्च २०१८ रोजी घडली. परंतु, दोन दिवसांपूर्वीच पेद्दे यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच त्या क्रमांकावर संपर्क साधून लोकेशन काढले.
सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या ज्ञानेश्वरला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी बोलते केले. तो बेपत्ता झाल्यापासून त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली, हे पटवून दिले. त्यालाही आघाव यांचे म्हणणे पटले. त्यानंतर औरंगाबाद येथून ज्ञानेश्वरला आणण्यात आले. मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी आई-वडील आणि ज्ञानेश्वर या तिघांनी एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आधारकार्डसाठी केला होता फोन
ज्ञानेश्वर याने घरातून बाहेर पडल्यानंतर साडेचार वर्षांत घरी एकदाही संपर्क केला नाही. परंतु, एका कामासाठी त्याला आधारकार्डची गरज होती. त्यासाठी वडिलांना अनोळखी क्रमांकावर कॉल केला अन् पोलिसांनी त्यावरून त्याचा काैशल्यपूर्णरित्या शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी ज्ञानेश्वरला विश्वासात घेऊन त्याची माहिती मिळवली.
शाळा नको म्हणून पळाला अन् बी. ए. झाला
घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता. याठिकाणी मात्र त्याला शिक्षण सोडल्याचा पश्चाताप झाला. येथे हाती पडेल ते काम करून त्याने मुक्त विद्यापीठातून बी. ए. प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता मात्र पुढील शिक्षण तो नांदेडलाच घेणार आहे.