धर्मांध भाजपला सत्तेबाहेर खेचा -गुलाम नबी आझाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 02:53 PM2019-04-11T14:53:09+5:302019-04-11T14:56:29+5:30
जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.
नांदेड : पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पराभवाचे प्रमुख ध्येय समोर ठेवून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. बॅरिस्टर ओवेसींची वंचित आघाडी ही भाजपा सरकारलाच मदत करण्यासाठी उभी असल्याचे सांगत या हैदराबादी नेत्यालाही थारा देऊ नका, असे ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. आझाद यांनी बुधवारी शहरातील पीरबुºहाणनगर आणि देगलूर नाका येथे प्रचारसभा घेतल्या. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे राजकारण जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. निष्कलंक चारित्र्याचा धनी असलेल्या या नेत्याने आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जोपासली. तीच विचारधारा खा. अशोकराव चव्हाण पुढे घेवून जात असल्याने खा. चव्हाणांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपने मागील साडेचार वर्र्षात केवळ धर्मांधतेचे राजकारण केले. मुस्लिमधर्मीयांना जाणीवपूर्वक हीन वागणूक दिली. तसेच या समाजबांधवांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरही गदा आणली. याच सरकारने तीन तलाक सारखा अत्यंत चुकीचा कायदा आणला. या कायद्याविरुद्ध काँग्रेसने संसदेत आवाज उठविला.
मतविभाजनाचा भाजपला लाभ
सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजाचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजपाला सत्तेबाहेर खेचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. आपली खरी लढाई फक्त धर्मांध भाजपा सरकारशी आहे. त्यामुळे ही लढाई लढताना धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपाला मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली