नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: August 8, 2024 07:50 PM2024-08-08T19:50:30+5:302024-08-08T19:51:44+5:30

खरीप हंगामात कृषी विभागाची कारवाई, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल

Licenses of 34 agricultural centers suspended in Nanded, 23 sellers to face court cases | नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

नांदेड : खरिप पेरण्याच्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळा बाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात कृषी विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेत ३४ कृषी निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर २३ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार असून, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे अनेक प्रकार आढळले होते. काही ठिकाणी विशिष्ट कंपनीचे बियाणे विकत घ्यावे, यासाठी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलली आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि बियांणांची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात आले. पेरणीच्या वेळी गर्दीचा फायदा घेत अनेक विक्रेते निकृष्ट खते, बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना निपाकी आणि त्यानंतर वाढलेल्या कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यासाठी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

खरीप हंगामात राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचेदेखील बघायला मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे खरीप हंगामात कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली.

२६९४ खत, बियाणे नमुन्यांच्या तपासण्या
जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात एकूण २६९४ विक्रेत्यांकडील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या तपासण्या केल्या. ९४९ नमुने काढण्यात आले. त्यांपैकी १३ विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली.

२१ विक्रेत्यांना दिले विक्री बंदचे आदेश
कृषी विभागाने खरीप हंगामात कृषी केंद्रांची तपासणी करून त्रुटी आढळलेल्या २१ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. ३४ परवाने निलंबित केले असून एका विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. निलंबित केलेल्या परवान्यामध्ये बियाणे १७, रासायनिक खताचे १७ परवाने आहेत.

साडेदहा लाखांचा साठा केला जप्त
खरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत एकूण १० लाख ५२ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात रासायनिक खताचा १० लाखांचा तर बियाणांचा ५२ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. खरीप हंगाम आला की, शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जाते.

Web Title: Licenses of 34 agricultural centers suspended in Nanded, 23 sellers to face court cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.