शिवारात रोषणाई; पण गजबजलेल्या वस्तीत अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:07+5:302020-12-06T04:19:07+5:30
शहरातील मंजुळानगर येथून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर पालिकेने सौर ऊर्जेचे दिवे लावून उजेड केला. विशेष म्हणजे सदरील पाणंद रस्ता शिवारातून ...
शहरातील मंजुळानगर येथून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर पालिकेने सौर ऊर्जेचे दिवे लावून उजेड केला. विशेष म्हणजे सदरील पाणंद रस्ता शिवारातून जात असल्याने दिवसाही रहदारी कमी प्रमाणात असते. अशा ठिकाणी सौर दिवे लावून पालिकेने काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि विविध वस्त्यांमध्ये दिवे नसलेले नुसते खांब उभे आहेत, तर कित्येक खांबावरील दिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीला शहरातील वस्त्यांमधील रस्त्यांवरून चालणे जिवावर बेतत आहे. त्यातच लहान सहान चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
यंदाच्या आर्थिक वर्षात शहर विकासासाठी पालिकेला विविध योजनांत नीधी प्राप्त झाला; परंतु ७ महिन्यांपूर्वी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा ५ वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्राप्त झालेल्या निधीची विल्हेवाट लावण्याची घाई पालिकेतील कारभाऱ्यांनी केली. जेथे विद्युतीकरणाची गरज नाही तेथे विद्युतीकरण केले व जेथे वस्तीच नाही तेथे रस्ते तयार करण्यात आले आहेत. यातून कारभाऱ्यांचे व संबंधित कंत्राटदारांचे हित जोपासण्यात आल्याने घाईघाईत केलेली कामे दर्जाहीन झाल्याची ओरड नागरिक करीत असून यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेने केलेल्या कामांची वरिष्ठांमार्फत चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून आमच्या वस्तीत लाइट नाही, अंधारात चाचपडत जावे लागते. अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या होतात. कित्येकदा नगरपालिकेला सांगितले तरी आमच्याकडे कोणी ध्यान देत नाही.
- भारतबाई गणेश जाधव, नाईकनगर तांडा, भोकर