लिंगायत समन्वय समिती करणार लिंगायतांची जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:07 PM2020-03-03T13:07:32+5:302020-03-03T13:09:19+5:30

लिंगायत समन्वय समितीचा ठराव

Lingayat Coordination Committee to conduct census of Lingayats | लिंगायत समन्वय समिती करणार लिंगायतांची जनगणना

लिंगायत समन्वय समिती करणार लिंगायतांची जनगणना

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय चिंतन बैठकसत्यशोधक लिंगायत साहित्य निर्मितीचा निर्णय 

नांदेड : लिंगायत बहुल राज्यात लिंगायत समन्वय समितीच्या वतीने समांतर जनगणना करण्यात येणार आहे़ त्यासाठी मोठी यंत्रणा समितीच्या वतीने निर्माण करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर लिंगायत धर्मात अनेक चुकीच्या परंपरा, अंधश्रद्धा, चालीरीती आहेत़ त्या बंद करुन देशभरातील लिंगायत समाजात एकसूत्रता आणण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीत घेण्यात आला़

रविवारी नांदेडातील अरुणा फंक्शन हॉल येथे चिंतन बैठकीच्या समारोपाला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते़ यावेळी बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, माधवराव पाटील टाकळीकर, चन्नबसवानंद महास्वामी, विजयकुमार पटने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अनेक महत्वपूर्ण ठराव मांडले़ देशातील लिंगायत बहुल राज्य असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, केरळमध्ये समन्वय समितीच्या वतीने समांतर लिंगायत जनगणना करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ त्यामध्ये लिंगायतातील पोटजातींचाही समावेश असणार आहे़ या सर्वेक्षण आणि जनगणनेचा अहवाल सरकारला देण्यात येणार आहे़ 

देशात ६० लाख लोकसंख्या असलेल्या जैन समाजाला वेगळी धर्ममान्यता मिळाली आहे़ असे असताना ८ कोटी लिंगायतांनी आपली स्वतंत्र ओळख व धर्ममान्यता मिळावी यासाठी फक्त लिंगायत एवढेच लिहिणे आवश्यक असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले़ २० हजार गावांमध्ये करणार विस्तार तसेच  देशातील २० हजार गावांमध्ये लिंगायत समन्वय समितीचा विस्तार करण्यात येणार आहे़ कर्मचारी, व्यापारी, युवक, महिलांसह देशातील सर्व संघटनांचा समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे़ लिंगायतांच्या आंदोलनात विशेषकरुन राजकारणी मंडळींना दूर ठेवण्यात येणार आहे़ राष्ट्रीय जनगणनेत धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहिणे़ स्वतंत्र रकान्यासाठी संघर्ष करण्याची तयारीही यावेळी दर्शविण्यात आली़

सत्यशोधक लिंगायत साहित्य निर्मितीचा निर्णय 
मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्यालम मधील सर्व लिंगायत साहित्यिकांना एका छताखाली आणून सत्यशोधक लिंगायत साहित्य निर्मितीचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ त्याचबरोबर लिंगायत समाजाच्या धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीवर या बैठकीत चिंतन करण्यात आले़ 

Web Title: Lingayat Coordination Committee to conduct census of Lingayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.