साहित्यसेवा म्हणजे सत्याची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:43 AM2018-04-02T00:43:23+5:302018-04-02T00:43:23+5:30
साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात डॉ. सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी तथा चित्रकार भ.मा. परसवाळे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार, प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, पुरस्कार समितीचे समन्वयक तथा लेखक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, आज शेतक-यांच्या दु:खाचं, त्यांच्या मरणाचं वर्णन साहित्यिक आपल्या साहित्यातून करतात. त्यावर कविता, कादंबºया लिहितात, परंतु, शेतक-यांवर ही वेळ का आणि कोणामुळे आली ? हे आता उजागर करण्यासाठी लेखन झालं पाहिजे. शेतकरीच का मरतो ? याच्या मुळाशी जाऊन लेखकांनी लिहिणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.
साहित्यामुळे संस्कृतीचे सर्व पदर शुद्ध झाले पाहिजेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, लेखकांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून लिहिताना विशिष्ट चौकटीत आपली बुद्धी गहाण ठेवता कामा नये. तसं झालं तर साहित्याचे खरं आकलन होणार नाही.
दरम्यान, यावेळी बन पुरस्कार विजेते अभिजित हेगशेट्टे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार हे साहित्याचे आशास्थाने आहेत, असे सांगून डॉ. सबनीस यांनी पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यकृतींचा गौरवाने उल्लेख केला. कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी भ. मा. परसवाळे यांना यावेळी ‘मातोश्री पद्मिनीबाई बन’ साधना सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी भ. मा. विचार व्यक्त करताना म्हणाले, कुठलाही चांगला लेखक हा त्याच्या निर्मितीशी, संहितेशी प्रामाणिक असला पाहिजे; पण आज अनेक पुरस्कारांच्या बाबतीत साशंकता निर्माण व्हावी, असे वातावरण आहे. पुरस्काराच्या मागे लागणारा हा खरा लेखक, कवी होऊच शकत नाही, असे सांगून परसवाळे यांनी साहित्य क्षेत्रातल्या वाईट आणि असभ्य प्रथांवर यावेळी ताशेरे ओढले.
तसेच पुरस्कारविजेते कादंबरीकार अभिजित हेगशेट्ये म्हणाले, कोकणातल्या उद्ध्वस्त होत असलेल्या भूमिपुत्रांची कथा ‘मी रानवीचा माळ’ या कादंबरीतून पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे असे डावपेच आणि षड्यंत्र सुरू आहेत की एखाद्या समूहाची सवयच बदलून टाकून तिथे आपले अधिराज्य निर्माण करण्याचा कापोर्रेट फंडा सुरू झाला आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचा सर्वच स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे.
तसेच प्रसाद बन वाङ्यम पुरस्काराचे मानकरी प्रदीप पाटील यावेळी म्हणाले, ‘गावकळा’ मधून मी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खेड्यातला सामान्य माणूसही कसा निधार्राने उभा राहून मोठं काम करू शकतो, याचं चित्रण ‘गावकळा’मधून केलं आहे. आजच्या पुरस्काराने खूप आनंद झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. सुरेश सावंत तर डॉ. सौ. वर्षा बन यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.